Karnataka mob lynching : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमालीचा वाढला आहे. दरम्यान, कर्नाटकच्या मंगळुरूमध्ये पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा दिल्याच्या आरोपावरून जमावाने एका व्यक्तीची बेदम मारहाण करत हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान 'पाकिस्तान झिंदाबाद'चा नारा देणाऱ्या व्यक्तीवर जमावाने संताप व्यक्त करत हल्ला केल्याची घटना रविवारी घडली. या प्रकरणी पोलिसांनी १० जणांना अटक केली आहे. इतर संशयितांचा शोध सुरू आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, रविवारी दुपारी येथे एका क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यात दहा संघ आणि १०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला पीडित तरुण आणि सचिन नावाच्या व्यक्तीमध्ये हाणामारी झाली. काही वेळातच लोकांनी पीडिताला घेरले आणि त्याला काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण जमाव इतका हिंसक होता की त्यांना तरुणाला मारहाण सुरूच ठेवली.
यानंतर पोलिसांना एका मंदिराजवळ एक मृतदेह सापडल्याची माहिती मिळाली. मंगळुरूचे पोलिस आयुक्त अनुपम अग्रवाल यांनी सांगितले की, सुरुवातीला कोणतीही मोठी दुखापत झाली नाही, ज्यामुळे अधिकाऱ्यांना नैसर्गिक मृत्यूचा संशय आहे. त्यानंतर हे प्रकरण मंगळुरू ग्रामीण पोलिस ठाण्याकडे सोपवण्यात आले. मात्र, सामन्यादरम्यान या व्यक्तीला जबर मारहाण करण्यात आल्याचे नंतर उघडकीस आले. शवविच्छेदन केल्यानंतर अंतर्गत रक्तस्त्राव आणि पाठीवर वारंवार वार केल्याने मृत्यू झाल्याचे पोलिसांना आढळले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीच्या पाठीवर, पोटावर आणि गुप्तांगावर लाकडाने अनेक वार करण्यात आले होते.
याप्रकरणी एका स्थानिकाने पोलिसांत एफआयआर दाखल केला असून यात १९ जणांची नावे आहेत. सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाइल डेटाच्या मदतीने पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी या घटनेला दुजोरा देत सांगितले की, या व्यक्तीचा रुग्णालयात मृत्यू झाला. सविस्तर अहवालाची प्रतीक्षा असून पुढील तपास सुरू आहे. जमावाने अज्ञात व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. मला सांगण्यात आले की, एका स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान तो पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत होता, ज्यामुळे काही लोकांनी त्याला मारहाण केली. सुमारे १० ते १२ जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. "
संबंधित बातम्या