Karnataka Murder: बायकोने सोबत झोपण्यास नकार दिल्याने तिची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या नवऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यातील सेडाम तालुक्यातील बटगेरा गावात घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी आणि मृत महिला यांच्यात किरकोळ गोष्टींवरून नेहमीच वाद होत असे. कुटुंबातील सदस्य अनेकदा मध्यस्थी करून त्यांचे वाद मिटवायचे. नुकत्याच झालेल्या भांडणानंतर महिला माहेरी निघून गेली. त्यानंतर आरोपीने सासरी जाऊन यापुढे भांडण करणार नाही, अशी ग्वाही दिली. त्यानंतर महिलेने शनिवारी पतीसह घरी परतण्याचा निर्णय घेतला. परंतु, रात्री त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद मिटण्याऐवजी आणखी पेटला. रागाच्या भरात आरोपीने महिलेच्या छातीवर कुऱ्हाडीने वार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला.
बायकोची हत्या केल्यानंतर आरोपीने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीची अधिक चौकशी केली असता बायकोने सोबत झोपण्यास नकार दिल्याने त्याला राग अनावर झाला. त्यानंतर त्याने घरातील कुऱ्हाडीने बायकोच्या छातीवर वार केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (हत्या) अंतर्गत अटक केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
उत्तर प्रदेशमधील इटौंजा येथील अकदरिया खुर्द गावाबाहेर ३५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. पोलिसांनी या घटनेत सहभागी तिचा प्रियकर मोनूसह तिघांना अटक केली आहे.आरोपी मोनू हा अकदरिया खुर्द गावचा रहिवासी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून तो या महिलेशी बोलत होता. २३ सप्टेंबर रोजी त्याने महिलेला रामकरणच्या शेतात बोलावले. मोनूसोबत गावातील त्याचा मित्र करण कश्यप आणि राजापूर गावचा करण होता. तिघांनी महिलेवर बलात्कार केला. विरोध केल्यामुळे तिला बेदम मारहाण करण्यात आली. महिलेने पोलिसांत तक्रार करण्याची धमकी दिल्यानंतर त्यांनी तिच्या डोक्यात दगड घालून तिची हत्या केली. हत्येनंतर तिचा मृतदेह ओढून शेताच्या काठावर फेकून देण्यात आला आणि नंतर ते पळून गेले. एडीसीपी नॉर्थ पंकज कुमार दुबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्स्पेक्टर इटौंजा मार्कंडेय यादव आणि त्यांच्या टीमने रविवारी सकाळी तिघांना अटक केली. आरोपींकडून महिलेचे ई-श्रमकार्ड, मतदार कार्ड, फोटो, तुटलेला मोबाइल आणि घटनेत वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात दिनेशची भूमिका आढळून आलेली नाही. मात्र, अजूनही तपास सुरू आहे. दिनेशही महिलेच्या घरी येत असे.