karnataka college orders kashmiri students to trim beard : कर्नाटकातील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील विद्यार्थ्यांना विद्यालयात प्रवेश करायचा असेल तर आधी दाढी कापून येण्याचे आदेश देण्यात आले आहे. कॉलेजच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. हसन जिल्ह्यातील शासकीय नर्सिंग कॉलेजने हे आदेश दिले आहे. विद्यार्थ्यानी आरोप केला आहे की, दाढी तसेच क्लीन शेव्ह न केल्याने त्यांची हजेरी देखील लावली जात नाही.
या नर्सिंग महाविद्यालयात सुमारे २४ काश्मिरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना दाढी कापण्यास किंवा क्लीन शेव्ह करण्यास विद्यार्थ्यानी सांगितले आहे. दरम्यान, मुलांनी दाढी कापली नसल्याने त्यांना वर्गात अनुपस्थित दाखवले जात आहे. त्यामुळे या मुलांचे शैक्षणिक रेकॉर्ड खराब होत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
जम्मू-काश्मीर स्टुडंट्स असोसिएशनने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना पत्र लिहून या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांना दाढी कापण्यास भाग पाडून त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक अधिकारांवर मर्यादा आणल्या जात असल्याचा आरोप मुलांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कॉलेज प्रशासनाने विद्यार्थ्यांना दाढी कापण्याचे आदेश दिले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना दाढी आहे, त्यांना अबसेंट दाखवलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.
दरम्यान, कॉलेजने त्यांची बाजू मांडली आहे. आम्ही कोणत्याही विशिष्ट गटाला लक्ष्य करत नसल्याचे कॉलेज प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. कॉलेजचे क्लिनिकल इन्स्पेक्टर विजय कुमार यांनी सांगितले की, सर्व विद्यार्थ्यांसाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये स्थानिक विद्यार्थ्यांचा देखील समावेश आहे. क्लिनिकल ड्युटीसाठी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. त्यामुळे हे नियम बनवले गेले आहे. महाविद्यालयाने सूचना देऊनही विद्यार्थी त्याचे पालन करीत नाहीत. त्यामुळे त्यांना कडक इशारा देण्यात आला आहे.
कॉलेज प्रशासनाने असेही म्हटले आहे की काश्मिरी विद्यार्थी बऱ्याचदा वर्गात उपस्थित राहत नाहीत. ते जाणीव पूर्वक वर्ग चुकवतात आणि धार्मिक प्रार्थनेला उपस्थित राहतात. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या सूचनेनंतर कॉलेज प्रशासनाने काश्मिरी विद्यार्थ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर त्यांना त्यांच्या धार्मिक बाबींसाठी परवानगी दिली आहे.