मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Karnataka News: कोबी मंच्युरियन खाणाऱ्यांनो सावधान; गोव्यानंतर आता कर्नाटकातही बंदी, कारण काय?

Karnataka News: कोबी मंच्युरियन खाणाऱ्यांनो सावधान; गोव्यानंतर आता कर्नाटकातही बंदी, कारण काय?

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Mar 11, 2024 05:51 PM IST

Karnataka bans food colour in gobi manchurian: कर्नाटक सरकारने आरोग्यासाठी घातक असलेल्या सिंथेटिक रंगावर बंदी घालण्याची घोषणा केली.

gobi manchurian
gobi manchurian

Karnataka Government Banned Artificial Colours: कर्नाटक सरकारने फूड कलरिंग एजंट रोडामाइन-बीच्या वापरावर बंदी घातली, ज्याचा वापर मंच्युरियन आणि कॉटन कँडी यासारखे पदार्थ तयार करण्यासाठी केला जातो. सिंथेटिक रंगाचा वापर करताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. कर्नाटक सरकारने कोबी मंच्युरिअनविरोधात एक विशेष मोहीम सुरू केली आहे. कोबी मंच्युरिअन तयार करताना रोडामाइन-बीचा वापर केला जातो, जे आरोग्यासाठी घातक आहे. सरकारी आदेशाचे पालन न केल्यास सात वर्षे तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. याशिवाय, १० लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावण्यात येणार आहे, असा इशारा राज्याचे आरोग्य मंत्री दिनेश गुंडू राव यांनी दिला.

दिनेश गुडू राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंच्युरिअन आणि कॉटन कँडीसारख्या पदार्थात सिंथेटिक रंगाचा वापर केला जात असल्याचे निदर्शनात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. याशिवाय, आणखी कोणत्या खाद्यपदार्थांत सिंथेटिक रंगाचा वापर केला जातोय का? याचाही तपास सुरू आहे. अन्न सुरक्षा ही आमची प्राथमिकता आहे. सिंथेटिक रंगामुळे आरोग्याला धोका आहे. नागरिकांनाही कोणत्या प्रकारचे अन्न खायचे? याची काळजी घेतली पाहिजे. खाद्यपदार्थात कोणत्या गोष्टींचा समावेश आहे, हे देखील पाहिले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याबाबत रेस्टॉरंट मालकांनाही जबाबदार धरले जाईल. तसेच दोषी आढळल्यास त्यांच्याविरोधात कडक कारवाई केली जाईल.

काही दिवसांपूर्वी गोवा नागरी संस्थेने त्यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्याच्या कडेला असलेल्या स्टॉल्सवर कोबी मंच्युरिअनच्या विक्रीवर बंदी घातली. एका अधिकाऱ्याने सांगितले की, डिश अस्वच्छ पद्धतीने तयार होत नसल्यामुळे आरोग्याची चिंता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला. म्हापसा नगरपालिकेच्या अध्यक्षा प्रिया मिशाळ म्हणाल्या की, नागरी संस्थेने रस्त्यावर विक्रेत्यांवर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांवर बंदी घालण्याचा ठराव मंजूर केला. विक्रेते पदार्थ बनवताना स्वच्छतेची काळजी घेत नाहीत आणि गोबी मंच्युरिअन तयार करण्यासाठी सिंथेटिक रंग वापरतात. नगरसेवक तारक आरोलकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. श्री बोदगेश्वर मंदिराच्या वार्षिक जत्रेत कोबी मंच्युरिअन विकणाऱ्यांना रस्त्यावर विक्रेते किंवा स्टॉल लावू नयेत, अशी सूचना त्यांनी केली.

WhatsApp channel

विभाग