Karnataka Accident : कर्नाटकमध्ये फळे व भाजीपाल्याची वाहतूक करणारा एक ट्रक ५० मीटर खोल दरीत कोसळल्याने १० जणांचा मृत्यू झाला आहे, तर १५ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मृत हे फळविक्रेते होते आणि सावनूर येथून येल्लापुरा जत्रेत फळे-भाज्या विकण्यासाठी जात होते. ही घटना बुधवारी सकाळी उत्तर कन्नड जिल्ह्यातील यल्लापुरा तालुक्यातील अरबैल घाटातील कागेरी पेट्रोलपंपाजवळ घडली. विशेष म्हणजे या ट्रकमध्ये तब्बल २५ पेक्षा जास्त व्यापारी व शेतकरी प्रवास करत होते. सावनूर-हुबळी रस्त्यावरील जंगली भागातून जात असताना हा अपघात झाला.
बुधवारी पहाटेच्या सुमारास येल्लापूर येथे अरेबेल आणि गुलापुरा दरम्यान राष्ट्रीय महामार्ग ६३ वर हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून पोलीसही हादरुन गेले. अपघातस्थळी फळं व भाज्यांचा चिखल झाला होता तर सर्वत्र रक्ताचा सडा पडला होता. जखमी वेदनेने विव्हळत होते तर ८ जणांनी जागीच जीव सोडला होता.
उत्तर कन्नडचे पोलीस अधीक्षक एम. नारायण यांनी सांगितले की, बुधवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास फळं-भाज्या घेऊन जाणाऱ्या ट्रकचालकाने दुसऱ्या वाहनाला जागा देण्याच्या प्रयत्नात ट्रक डावीकडे वळवला. मात्र, धुक्यामुळे रस्ता न दिल्याने तो जास्तच वळवण्यात आल्याने ट्रक सुमारे ५० मीटर खोल दरीत कोसळला. रस्त्याच्या कडेला दरीत सुरक्षा भिंत तसेच बॅरिकेडिंग नसल्याने ट्रक घसरला आणि खोल दरीत कोसळला. मृतांमध्ये अनेक शेतकरी आहेत.
पहाटेच्या सुमारास धुक्याचे वातावरण असल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. धुक्याच्या वातावरणामुळे पुढील वाहनाचा अंदाज न आल्याने ट्रक चालकाचा पुढच्या वाहनाला वाट करून देण्याच्या प्रयत्नात ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर, ट्रक बाजुच्या खड्ड्यात ट्रक पडली असल्याचे प्राथमिक माहितीनुसार सांगण्यात येत आहे. दरम्यान, अपघातातील जखमींना हुबळी किम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यल्लापूर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पुढील तपास सुरू केला आहे.
कर्नाटकमध्ये दुसऱ्या एका अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ विद्यार्थ्यांचाही मृत्यू झाला आहे. रायपूर जिल्ह्यात ही घटना घडली. सिंधनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार चाकी वाहन पलटी झाल्याने हा अपघात झाला. नरहरी मंदिरात पूजा करण्यासाठी विद्यार्थ्यांची कार हम्पीच्या तिर्थयात्रेसाठी निघालेली होती. मात्र, भीषण दुर्घटनेत कारमधील ४ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे, कर्नाटकमधील अपघाताच्या दोन घटनांत एकूण १४ जणांचा मृ्त्यू झाला आहे.
दरम्यान,अपघाताच्या दोन्ही घटनांवर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना ३ लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली आहे. तसेच जखमींवर उपचाराच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या