PM Modi on Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिनाच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज द्रास येथील युद्ध स्मारकासमोर नतमस्तक होत कारगिल युद्धातील शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला थेट आणि स्पष्ट शब्दांत सुनावलं. ‘तुमचे नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे सैनिक छुपा दहशतवाद पूर्ण ताकदीनं चिरडून टाकतील,’ असा इशारा त्यांनी दिला.
'देशासाठी देलेलं बलिदान अमर असतं. दिवस, महिने, वर्षे जातील. शतकं निघून जातील. मात्र देशासाठी जीव देणाऱ्यांची नावं अमिट राहतील. कारगिल विजय दिवस हे सांगणारा दिवस आहे. हा देश या पराक्रमी महायनायकांप्रति कृतज्ञ आहे,' अशा भावना पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केल्या.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी पाकिस्तानचं नाव घेऊन तिथल्या राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावले. 'पाकिस्ताननं यापूर्वी अनेकदा दु:साहस केलं, त्या प्रत्येक वेळी ते तोंडघशी पडले. मात्र, पाकिस्ताननं इतिहासातून अजिबात धडा घेतलेला नाही. दहशतवादाच्या आधारानं, छुप्या युद्धाच्या कुरापती करून स्वत:ला चर्चेत ठेवण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे, असं मोदी म्हणाले.
'मी आज जिथून बोलतोय, तिथून माझा आवाज दहशतवाद पोसणाऱ्यांना स्पष्ट ऐकू जात असेल. मी त्यांना सांगू इच्छितो. त्यांचे कुटिल डाव आणि नापाक मनसुबे कधीच यशस्वी होणार नाहीत. आमचे सैनिक दहशतवाद सर्व शक्तीनिशी चिरडून टाकतील. शत्रूला जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं त्यांनी ठणकावलं. लडाख असो किंवा जम्मू-काश्मीर, विकासाच्या आड येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला भारत पराभूत करणारच, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.
अग्निपथ योजनेला विरोध करणाऱ्या राजकीय विरोधकांचाही मोदी यांनी यावेळी समाचार घेतला. 'ही योजना म्हणजे भारतीय लष्करानं केलेल्या आवश्यक सुधारणांचं हे एक उदाहरण आहे. राजकारण्यांना सलाम करणं, परेड करणं एवढंच सैन्याचं काम आहे असं काही लोकांना वाटतं, पण आमच्यासाठी लष्कर म्हणजे १४० कोटी देशवासीयांचा विश्वास आहे, असं मोदी म्हणाले.
अग्निपथ योजनेचं त्यांनी समर्थन केलं. भारतीय लष्कराला अधिकाधिक तरुण बनविणं, लष्कराला युद्धासाठी सतत फिट ठेवणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. दुर्दैवानं काही लोकांनी राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित अशा संवेदनशील विषयावर राजकारण सुरू केलं आहे. हजारो कोटींचे घोटाळे करून आपल्या लष्कराला कमकुवत करणारेच लोक विरोध करणाऱ्यांमध्ये आहेत, असं मोदी म्हणाले.
२६ जुलै १९९९ रोजी भारतीय लष्करानं लडाखमधील कारगिलच्या बर्फाळ पर्वतरांगांवर सुमारे तीन महिने चाललेल्या लढाईनंतर पाकिस्तानवर विजय मिळवला होता. ‘ऑपरेशन विजय’ ही मोहीम यशस्वी केली होती. या विजयाच्या स्मरणार्थ हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो.
संबंधित बातम्या