akhil bharatiya kisan sabha slams kangana ranaut : देशात भारतीय जनता पक्षाचं सरकार आल्यापासून हिंदी सिनेसृष्टीतील काही कलाकार सरकारच्या बाजूनं कमालीचे सक्रिय झाले आहेत. सरकारची भलामण करताना हे कलाकार अनेकदा बेताल बडबड करतात. कंगना राणावत ही त्यापैकीच एक आहे.
हिमाचलमधील मंडी मतदारसंघातून भाजपतर्फे लोकसभा निवडणूक लढवून खासदार झालेली कंगना राणावत हिनं काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी आंदोलनाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यामुळं सध्या देशात संताप आहे. महाराष्ट्रातील शेतकरी देखील कंगनावर भडकले आहेत.
अखिल भारतीय किसान सभेनं कंगनाच्या या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. 'आंदोलनाच्या आडून देशात बांगलादेश घडवण्याचं शेतकऱ्यांचं षड्यंत्र होतं हे कंगना राणावतचं वक्तव्य अत्यंत बेताल आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या ऐतिहासिक शेतकरी आंदोलनात शहीद झालेल्या ६०० पेक्षा जास्त शेतकरी शहिदांचा, आंदोलनात सहभागी झालेल्या हजारो हजारो शेतकरी माता भगिनींचा व देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा हा घोर अपमान आहे, असं किसान सभेचे नेते अजित नवले यांनी म्हटलं आहे.
'कंगना राणावत हिनं यापूर्वी सुद्धा शेतकरी आंदोलनाबद्दल अशाच प्रकारची बेताल वक्तव्य केली आहेत. स्वातंत्र्य संग्रामाबद्दल सुद्धा अशाच प्रकारची बेताल वक्तव्य यापूर्वी तिच्याकडून करण्यात आली आहेत. कंगना करत असलेली वक्तव्य या देशातील स्वातंत्र्य युद्ध आणि या देशात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचं सुनियोजित षडयंत्र आहे. या षडयंत्रामागे असणाऱ्या शक्तींचा देशभरातील शेतकरी, शेतकऱ्यांची पोरं आणि या देशावर प्रेम करणारे नागरिक तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहेत, असा संताप नवले यांनी व्यक्त केला आहे.
एका मुलाखतीत तिनं शेतकरी आंदोलनाविरुद्ध धक्कादायक आरोप केले. शेतकऱ्यांनी आंदोलनाच्या नावाखाली हिंसाचार केला. आंदोलन स्थळी बलात्कार झाले. लोकांना मारून लटकवलं गेलं. या आंदोलनामागे चीन व अमेरिकेचा हात होता. आंदोलकांनी मोठं कटकारस्थान रचलं होतं. केंद्र सरकारनं कृषी कायदे मागे घेतल्यामुळं त्यांचा कट फसला. नाहीतर बांगलादेशसारखी परिस्थिती निर्माण झाली असती, असं कंगना म्हणाली.