kanpur kalindi express : कानपूर ते शिवराजपूर दरम्यान रेल्वे ट्रॅकवर सिलेंडर ठेवून त्याचा स्फोट घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. लोको पायलटच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली आहे. प्रयागराजमधून भिवनैसाठी जाणाऱ्या कालिंदी एक्स्प्रेस सिलेंडरचा स्फोट करून उडवण्याचा कट आखण्यात आला होता. मात्र, लोको पायलटच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली. या रेल्वे ट्रॅकवर एक एलपीजी गॅस सिलेंडर उलटा ठेवण्यात आला होता. या प्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आला आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. घटनास्थळी पोलिसांना ट्रॅकजवळ एक पेट्रोल बॉम्ब व पांढरे रसायन सापडले आहे.
कानपूरचे अतिरिक्त आयुक्त हरीश चंद्र यांनी घटनास्थळी येत माध्यमांना सांगितले की, रेल्वे चालकाने सिलिंडर ट्रॅकवर ठेवलेला पाहिला. यानंतर त्याने आपत्कालीन ब्रेक लावला. आपत्कालीन ब्रेक लावल्यामुळे, सिलिंडरला गाडी धडकण्यापूर्वी रेल्वेचा वेग कमी झाला. गाडीची धडक झाल्यावर हा सिलिंडर बाजूला पडला. यानंतर याची माहिती ही रेल्वे प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली. पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. गुन्ह्याच्या ठिकाणी सापडलेल्या इतर वस्तूंचा संदर्भ देत एसीपी म्हणाले की फॉरेन्सिक टीम सर्व पुरावे गोळा करत आहे. यामागे दहशतवादी कारस्थान असल्याच्या प्रश्नावर एसीपी म्हणाले की, पोलीस सर्व तथ्ये व बाजूने तपास करत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक आणि डॉग स्कॉड देखील बोलावण्यात आले आहे. रेल्वे लाईन सुरु असून ट्रेन पुढच्या प्रवासाला पाठवण्यात आली आहे. या घटनेचा सर्व बाजूने तपास करण्यात येणार असल्याचं हरीश चंद्र यांनी सांगितले.
रेल्वे चालकाच्या सतर्कतेमुळे प्रयागराज-भिवानी कालिंदी एक्सप्रेस कानपूरमध्ये संभाव्य अपघाताची शिकार बनून थोडक्यात बचावली. एलपीजी सिलिंडरचा स्फोट करून इंजिन उडवून पुढे पेट्रोल बॉम्बचा वापर करण्याचा कट रचण्यात आला होता, परंतु चालकाच्या शहाणपणामुळे हा डाव फसला. कानपूरमधील बराजपूर आणि बिल्हौर दरम्यान मुंढेरी क्रॉसिंगजवळ रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास कालिंदी एक्स्प्रेसच्या इंजिनला एलपीजी सिलेंडर धडकला व रुळावरून खाली पडला. रेल्वे आणि पोलिसांचे पथक दाखल झाले. तपासादरम्यान जवळच सापडलेल्या सिलिंडरशिवाय एका बॅगेत पेट्रोल बॉम्ब, माचिस आणि पावडरसारखी वस्तू आढळून आली.
सर्व तपासणी केल्यावर कालिंदी एक्स्प्रेस पुढच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आली. रेल्वे रुळाचे कोणतेही नुकसान झाले नाही, त्यामुळे या मार्गावरील रेल्वे सेवा ही सुरळीत आहे. गेल्या महिन्यातही कानपूरमध्ये साबरमती एक्स्प्रेसचे २२ डबे रुळावरून घसरले होते. या अपघातावेळी रुळावर दगड ठेवण्यात आले होते. रुळावर असलेला दगड पाहून ट्रेन चालकाने ब्रेक लावला. पण, तो वेळीच लागला नाही. त्यामुळे २० ते २२ डबे रुळावरून घसरले. या अपघाताच्या तपास पोलिसांबरोबरच आयबी देखील करत आहे.
आठ वर्षांपूर्वी नोव्हेंबर २०१६ मध्ये कानपूरमध्येच पाटणा-इंदूर एक्स्प्रेस उलटली होती, ज्यामध्ये १५२ लोकांचा मृत्यू झाला होता. त्या अपघाताच्या वेळी देखील घातपात झाल्याचे बोलले जात आहे. बिहारमध्ये मोती पासवान नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दुबईत बसलेल्या काही मास्टरमाइंडने पैसे देऊन हे काम करून घेतले होते. मोती पासवान यांनी सांगितले होते की, या घटनेशी संबंधित लोकांना रेल्वे ट्रॅकला तांत्रिकदृष्ट्या खराब करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले होते.