Justice Sanjiv Khanna next CJI: भारताचे ५१ व्या सरन्यायाधीशपदी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची वर्णी लागली आहे. केंद्रीय विधी व न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी ही घोषणा केली आहे. सध्याचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी नवे सरन्यायाधीश म्हणून गेल्या आठवड्यात संजीव खन्ना यांचे नाव सुचविले होते. त्यानंतर आता राष्ट्रपतींनी खन्ना यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहेत. संजीव खन्ना हे ११ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.
संजीव खन्ना यांची देशाचे नवे सरन्यायाधीश म्हणून राष्ट्रपतींनी घोषणा केली आहे. ते विद्यमान सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांची जागा घेतील. ५१ वे सरन्यायाधीश बनलेले संजीव खन्ना सध्या सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश आहेत. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यानंतर संजीव खन्ना हे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. त्यांच्या काळात त्यांनी काही ऐतिहासिक व महत्त्वाचे निकाल घेतले आहेत. यापूर्वी न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ८ नोव्हेंबर २०२२ रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ घेतली होती.
कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर संजीव खन्ना यांच्या निवडीची माहिती दिली. भारतीय राज्यघटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करून राष्ट्रपती यांनी सरन्यायाधीशांशी सल्लामसलत केल्यानंतर ११ नोव्हेंबर २०२४ पासून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संजीव खन्ना यांची भारताचे सरन्यायाधीश (सीजेआय) म्हणून नियुक्ती घोषित केली. १३ मे २०२५ रोजी निवृत्त होण्यापूर्वी न्यायमूर्ती खन्ना सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ या पदावर राहतील.
सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड आपल्या कार्यकाळात चर्चेत राहिले होते. गेल्या दोन वर्षांत त्यांनी इलेक्टोरल बॉण्डसह अनेक महत्त्वाच्या खटल्यांमध्ये निकाल दिले आहेत. याशिवाय यापूर्वी अयोध्या वाद, शबरीमला प्रकरण आदींचा निकाल देणाऱ्या खंडपीठातही त्यांचा सहभाग होता.
संजीव खन्ना यांचा जन्म १४ मे १९६० रोजी झाला असून सुमारे चार दशकाहून अधिक काळ ते न्यायिक क्षेत्रात काम करत आहेत. न्यायमूर्ती खन्ना यांनी १९८३ मध्ये दिल्ली बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून नोंदणी करून आपल्या वकिली कारकिर्दीची सुरुवात केली. तीस हजारी जिल्हा न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयासह विविध न्यायालयांमध्ये त्यांनी वकिली केली. २००५ मध्ये त्यांची दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि २००६ मध्ये ते कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. १८ जानेवारी २०१९ रोजी त्यांची सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती म्हणून निवड झाली. न्या. संजीव खन्ना हे सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. तसेच राष्ट्रीय न्यायिक अकादमी, भोपाळच्या गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्य आहेत. जून ते डिसेंबर २०२३ या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवा समितीचे अध्यक्षपदही भूषविले होते.