
न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी रविवारी तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली.
आराधे हे यापूर्वी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. हैदराबाद येथील राजभवनात आयोजित एका कार्यक्रमात राज्यपाल तमिलिसाई सुंदरराजन यांनी त्यांना तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्यासह त्यांचे काही कॅबिनेट सहकारीही उपस्थित होते.
न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांच्या जागी आराधे यांची तेलंगणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती उज्ज्वल भुईया यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावर बढती देण्यात आली.
न्यायमूर्ती आराधे यांचा जन्म १३ एप्रिल ९१६४ रोजी झाला आणि १२ जुलै १९८८ पासून त्यांनी वकीली सुरु केली. न्यायमूर्ती आराधे यांनी मध्य प्रदेश उच्च न्यायालयात दिवाणी आणि घटनात्मक, लवाद आणि कंपनी प्रकरणांत वकीली केली.
२९ डिसेंबर २००९ रोजी त्यांची मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली. न्यायमूर्ती आराधे यांनी १७ नोव्हेंबर २०१८ रोजी कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. त्यांनी ३ जुलै २०२२ रोजी या न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.


