देश-विदेशात सत्ताधाऱ्यांवर टीका करणाऱ्या पत्रकारांवर हल्ले वाढत असून विविध पत्रकार संघटनांनी या घटनांबाबत चिंता व्यक्त केली आहे. दक्षिण आशियाई देशांमध्येही या प्रकारच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. पाकिस्तानात सत्ताधारी वर्गावर आणि निवडून आलेल्या सरकारवर नियंत्रण राखणाऱ्या शक्तीशाली लष्करावर टीका करणाऱ्या एका पत्रकाराला नुकतीच अटक करण्यात आली आहे. इम्रान रियाझ खान असं या पत्रकाराचं नाव असून ताज्या घडामोडींचे त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर चांगलेच लोकप्रिय आहेत.
पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहे. या निवडणुकीमध्ये प्रचंड हेराफेरी करण्यात आल्याचा आरोप माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या ‘तहरिक-ए- इन्साफ’ सह ‘जमाते इस्लामी’ आणि इतर विविध राजकीय पक्षांनी केला आहे. निवडणूक घोटाळ्याविरोधात या विरोधी पक्षांनी पाकिस्तानातील विविध शहरांमध्ये निदर्शने आयोजित केली होती.
दरम्यान, अटक करण्यात आलेले पत्रकार, यूट्यूबर इम्रान रियाझ खान यांना एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणात लाहोर येथील घरातून अटक करण्यात आली. इम्रान रियाज यांना कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. खान आणि त्याच्या वडिलांनी सरकारी तलाव खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप पाकिस्तानच्या भ्रष्टाचारविरोधी पोलीसांनी केला आहे. परंतु पोलिसांकडे यासंबंधी काहीही पुरावा नसून हा तद्दन खोटा आरोप असल्याचा दावा पत्रकार खान यांच्या वकिलाने कोर्टात केला आहे.
पत्रकारांशी बोलताना इम्रान रियाज खान यांनी नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ हिच्यावर गंभीर आरोप केले आहे. इम्रान रियाज खान म्हणाले, 'मला खोट्या प्रकरणात अटक करण्यात आलीय. याला पाकिस्तान मुस्लिम लीग-(नवाज) जबाबदार आहे. नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाझ या पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी लवकरच विराजमान होणार आहे. राणी मरियम नवाज यांना अभिवादन करण्यासाठी माझ्या मनगटावर हातकड्या बांधण्यात आल्या आहेत. निवडणुकीत हेराफेरी करून राणीला मुख्यमंत्री बनवले जात आहे' असा आरोप खान यांनी केला आहे. ‘माझे बहुतेक पत्रकार मित्र मला पाकिस्तान सोडून जाण्यास सांगतात. पण मी त्यांना सांगतो की मी जिवंत असेपर्यंत पाकिस्तानातच राहीन’ असं खान याने सांगितलं.
मे २०२३ मध्ये माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या कार्यालयांवर हल्ला केला होता. या हल्ल्यानंतर दोन दिवसांनंतर इम्रान रियाज खान यांनाही पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्यांना जामीन मिळाला होता. इम्रान रियाज खान यांना पोलीस घरातून पकडून नेत असल्याचे व्हिज्युअल्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तहेरिक ए इन्साफ पक्षाने इम्रान रियाझ खानच्या अटकेचा निषेध केला असून त्याच्या तत्काळ सुटकेची मागणी केली आहे.