मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अमेरिकेला SCने १५० वर्षे मागे ढकललं, गर्भपाताच्या निर्णयावर बायडेन संतापले

अमेरिकेला SCने १५० वर्षे मागे ढकललं, गर्भपाताच्या निर्णयावर बायडेन संतापले

Suraj Sadashiv Yadav HT Marathi
Jun 25, 2022 09:08 AM IST

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी प्रतिक्रिया देताना सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक रो विरुद्ध वेड निर्णय बदलून एक मोठी चूक केल्याचं म्हटलं आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (फोटो - एएफपी)

अमेरिकेत महिलांचा गर्भपाताचा (Abortion Law) घटनात्मक अधिकार सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) रद्द केला आहे. यानंतर अमेरिकेसह जगभरातील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त केला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी प्रतिक्रिया देताना सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक रो विरुद्ध वेड (roe vs wade) निर्णय बदलून एक मोठी चूक केल्याचं म्हटलं आहे. "न्यायालायने ते काम केलं की जे याआधी कधीच झालं नव्हतं. न्यायालयाने थेट संविधानाने दिलेला अधिकार काढून घेतला आहे. सर्व अमेरिकन नागरिकांसाठी तो मूलभूत अधिकारसुद्धा आहे. माझ्या मते सर्वोच्च न्यायालयाने केलेली ही चूक आहे." असं बायडेन यांनी म्हटलं.

अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ५० वर्षांपूर्वीचा रो विरुद्ध वेड निर्णय फिरवला आहे. यामुळे गर्भपाताचा अधिकार रद्द केला आहे. यामुळे अमेरिकेतील अर्ध्याहून अधिक राज्यांमध्ये गर्भपातावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. ज्यो बायडेन यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, न्यायालयाच्या या निर्णयाने अमेरिकेला दीडशे वर्षे मागे ढकललं आहे.

अमरिकेच्या सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय गर्भपाताविरोधात अनेक दशकांपासून लढा देणाऱ्यांच्या प्रयत्नांना मिळालेल यश असल्याचं म्हटलं जात आहे. न्यायाधीश सॅम्युअल अलिटो यांची या निर्णयासंबंधातील माहिती एक महिन्यापूर्वी लीक झाली होती. त्यानुसार न्यायालय गर्भपाताला असलेलं संविधानिक संरक्षण रद्द करू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात होती. त्यानंतर नागरिक रस्त्यावर उतरले होते. न्यायालयाच्या निर्णयावर बहुतांश अमेरिकन नागरिकांनी विरोध करताना म्हटलं की, "गर्भपात करणं किंवा न करणं हा महिलांचा अधिकार आहे. महिलांना १९७३ मधील रो विरुद्ध वेड प्रकरणात निकालानंतर हा सुरक्षित गर्भपाताचा अधिकार मिळाला होता."

सॅम्युअल अलिटो यांनी शुक्रवारी गर्भपाताबाबत निर्णयाची सुनावणी केली. त्यांनी म्हटलं की, "गर्भपाताच्या अधिकारावर शिक्कामोर्तब करणारा १९९२ चा निर्णय चुकीचा होता, तो बदलायला हवा." जगभरातील अनेक नेत्यांनी या निर्णयाच्या विरोधात प्रतिक्रिया दिली आहे.

WhatsApp channel

संबंधित बातम्या