asaram bapu health news : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू आसाराम बापू याची तब्येत बिघडली आहे. काल रात्री छातीत दुखत असल्याची तक्रार त्यानं केली. त्यानंतर रात्री उशिरा त्याला जोधपूर इथल्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
आसाराम बापू यानं तीन दिवसांपूर्वी सुद्धा छातीत दुखत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र, तपासणीत काही गंभीर आढळून न आल्यामुळं त्याला पुन्हा तुरुंगात पाठवण्यात आलं.
काल (गुरुवार, २० जून) रात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांची प्रकृती पुन्हा खालावल्यानं त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. आसाराम यांच्या मेडिकल रिपोर्टनुसार, त्याला ॲनिमियाचा त्रास असून त्यांची हिमोग्लोबिन पातळी ८.७ असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
पोटात अंतर्गत रक्तस्रावासह इतर तक्रारींवर डॉक्टर उपचार करत आहेत. याशिवाय अनेक प्रकारची तपासणी सुरू आहे. उपचारात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून आसारामच्या अनुयायांच्या संघटनेच्या अधिकृत हँडलवरून गर्दी न करण्याचं आवाहन लोकांना करण्यात आलं आहे.
राजस्थान उच्च न्यायालयानं २१ मार्च रोजी आसारामला पोलिस संरक्षणात जोधपूरमधील खासगी आयुर्वेदिक रुग्णालयात १० दिवस उपचार घेण्याची परवानगी दिली होती. महाराष्ट्रातून आलेल्या आयुर्वेद तज्ज्ञानं त्याच्यावर उपचार केले. आसारामनं महाराष्ट्रातील खापोली इथं उपचारासाठी अर्ज केला होता. मात्र, महाराष्ट्र पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव उपचारासाठी परवानगी दिली नाही.
अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केल्याच्या आरोपावरून आसारामला जोधपूर कोर्टानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यानुसार आसाराम मरेपर्यंत तुरुंगातच राहणार आहेत. तुरुंगातून सुटण्यासाठी आसारामचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी त्याच्या वतीनं जामीन आणि पॅरोलसाठी डझनभर अर्ज उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आले होते, मात्र सध्या तरी त्याला कुठलाही दिलासा मिळालेला नाही.
एकेकाळी आसाराम बापू हे एक मोठं प्रस्थ होतं. देशभरात त्याचे अनुयायी होते. देशातील अनेक राज्यांत त्याचे आश्रम चालत. राजस्थानमधील एका १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या प्रकरणात त्याचं नाव आलं आणि त्यानंतर त्याचे अनेक कारनामे पुढं आले. २०१४ साली त्याला अटक करण्यात आली होती. सध्या तो जोधपूर मध्यवर्ती कारागृहात जन्मेठेपेची शिक्षा भोगत आहे.