JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत RSS प्रणित अभाविपचा सुपडा साफ! डाव्यांनी चारही जागा जिंकल्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत RSS प्रणित अभाविपचा सुपडा साफ! डाव्यांनी चारही जागा जिंकल्या

JNU विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत RSS प्रणित अभाविपचा सुपडा साफ! डाव्यांनी चारही जागा जिंकल्या

Mar 25, 2024 10:02 AM IST

JNUSU Election 2024 Results: जेएनयू विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्या संघटनांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव करत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशननं अध्यक्षपदासह चारही जागा जिंकल्या आहेत.

जेएनयू पॅन-युनियन निवडणुकीत डाव्या उमेदवारांनी सर्व चार केंद्रीय पॅनेल जागांवर विजय मिळवला आहे.
जेएनयू पॅन-युनियन निवडणुकीत डाव्या उमेदवारांनी सर्व चार केंद्रीय पॅनेल जागांवर विजय मिळवला आहे.

JNUSU Election 2024 Results: संपूर्ण देशातील राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेणाऱ्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत डाव्यांनी निर्विवाद बाजी मारली आहे. डाव्यांच्या ऑल इंडिया स्टुडंट्स युनियननं या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा दारुण पराभव केला. 

चार वर्षांच्या कालावधीनंतर झालेल्या निवडणुकीत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) चा उमेदवार धनंजय यानं २५९८ मते मिळवून अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली. जेएनयू विद्यार्थी संघाचा तो पहिला दलित अध्यक्ष ठरला आहे. त्याचा प्रतिस्पर्धी अभाविपचा उमेश सी अजमीरा याला केवळ १६७६ मते मिळाली. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाचा (SFI) अविजित घोष यांनं अभाविपच्या दीपिका शर्माचा पराभव करून उपाध्यक्षपद पटकावलं.

Raj Thackeray in Delhi : राज ठाकरे दिल्लीला रवाना; भाजप-मनसे युतीवर शिक्कामोर्तब होणार?

डावी संघटना BAPSA च्या उमेदवार प्रियांशी आर्य हिनं सरचिटणीसपदाच्या निवडणुकीत अभाविपच्या अर्जुन आनंद याचा पराभव केला. डाव्या संघटनांच्या उमेदवार स्वाती सिंह हिचा अर्ज निवडणूक समितीने रद्द केल्यानंतर डाव्या संघटनांनी प्रियांशी आर्य हिला पाठिंबा दर्शवला होता. संयुक्त सचिवपदी डाव्या संघटनांचा उमेदवार मोहम्मद साजिद निवडून आला. त्यानं अभाविपच्या गोविंदचा पराभव करून विजय मिळवला.

Narendra Modi : अब की बार ४०० पार.. इतक्या जागा कशाला हव्यात?, पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितलं

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (JNUSU) निवडणुकीत शुक्रवारी ७३ टक्के मतदान झालं. गेल्या १२ वर्षांत झालेल्या निवडणुकांमधील हे सर्वाधिक मतदान होतं. दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत ७७०० हून अधिक नोंदणीकृत मतदारांनी गुप्त मतदानाद्वारे आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

शिक्षकांसमोर विद्यार्थिनीचे कपडे काढून घेतली झडती, घरी जाऊन मुलीची आत्महत्या

मतदानासाठी विविध अभ्यास केंद्रांमध्ये एकूण १७ मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले मतदान सायंकाळी ७ वाजेपर्यंत सुरू होते. जेएनयूमध्ये २०१९ मध्ये ६७.९ टक्के, २०१८ मध्ये ६७.८टक्के, २०१६-१७ मध्ये ५९ टक्के, २०१५ मध्ये ५५ टक्के, २०१३-१४ मध्ये ५५ टक्के आणि २०१२ मध्ये ६० टक्के मतदान झाले होते. मतदार आपापल्या केंद्रावर मतदानासाठी रांगेत उभे असताना विविध विद्यार्थी संघटनांच्या समर्थकांनी त्यांच्या नेत्यांच्या बाजूने घोषणाबाजी केली.

सकाळी ११ पासून मतदान केंद्रांवर मोठ्या संख्येने विद्यार्थी जमू लागल्याने ढोल-ताशांच्या गजरात जय भीम, भारत माता की जय आणि लाल सलामच्या घोषणांनी वातावरण तापले होते. जेएनयूएसयू केंद्रीय पॅनेलसाठी एकूण १९ उमेदवार रिंगणात होते, तर स्कूल कौन्सिलर पदासाठी ४२ जणांनी नशीब आजमावले. विद्यार्थी संघाच्या अध्यक्षपदासाठी आठ उमेदवारांमध्ये लढत होती. जेएनयू विद्यार्थी संघाच्या केंद्रीय पॅनेलमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सहसचिव आणि सरचिटणीस यांचा समावेश आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर