Jharkhand News : ईडीकडून दिवसभर झालेल्या चौकशीनंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. राज्यपालांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला असून चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. हेमंत सोरेन यांच्या अटकेनंतर त्याची पत्नी कल्पना सोरेन झारखंडच्या मुख्यमंत्री बनतील अशा चर्चा सुरू होत्या. मात्र सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे आपले वरिष्ठ सहकारी चंपाई सोरेन यांच्याकडे सोपवली आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या विधीमंडळ दलाच्या बैठकीनंतर चंपई सोरेन यांना सभागृह नेता म्हणून निवडण्यात आले. राज्याचे नवे मुख्यमंत्री चंपई सोरेन बनणार आहे. मात्र चंपई सोरेन यांचा शपथविधी कधी होणार याबाबत तारीख व वेळ निश्चित केलेली नाही. मात्र आमदार व मंत्र्यांची इच्छा आहे की, त्यांचा लवकरच शपथविधी पार पडावा.
चंपई सोरेन यांनी काही दिवसापूर्वी एक फोटो शेअर केला होता. हेमंत सोरेन या फोटोत चंपई याचे अनोख्य अंदाजात अभिवादन करताना दिसत आहेत. चंपई हेमंत सोरेन कॅबिनेटमधील वरिष्ठ मंत्री आहेत.
चंपई सोरेन यांच्या वडिलांचे नाव सिमल सोरेन आहे. त्यांचे वडील सरायकेला-खरसावां जिल्ह्यातील जिलिंगगोड़ा गावचे रहिवासी आहेत. चंपई यांचे वडील शेती करत होते. चंपईही शेतीकामात वडिलांची मदत करत होते. चंपई यांनी १० पर्यंत सरकारी शाळेत शिक्षण घेतले असून त्यांचे लहान वयातच लग्न झाले आहे. चंपई यांना चार मुले व तीन मुली आहेत.
बिहारमधून वेगळ्या झारखंड राज्याची मागणी जोर धरू लागल्यानंतर शिबू सोरेनच्या साथीने चंपईही झारखंड आंदोलनात उतरले. या आंदोलनामुळे त्यांना ‘झारखंड टाइगर’ नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर चंपई सोरेन यांनी सरायकेला विधानसभा मतदारसंघातील एका पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली व आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. त्यानंतर त्यांनी झारखंड मुक्ति मोर्चा पक्षात प्रवेश केला.
चंपई सोरेन भाजप नेते अर्जुन मुंडा यांच्या २ वर्ष १२९ दिवसांच्या सरकारमध्ये मंत्री राहिले आहेत. चंपई ११ सप्टेंबर २०१० ते १८ जानेवारी २०२३ पर्यंत मंत्री होते. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागली व त्यानंतर हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात झारखंड मुक्ति मोर्चाच्या सरकारमध्ये चंपई सोरेन यांना खाद्य व अन्न पुरवठा तसेच परिवहन मंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. चंपई यांना २०१९ मध्ये दुसऱ्यांदा हेमंत सोरेन सरकारमध्ये मंत्रीपद देण्यात आले. चंपई झामुमो पक्षाचे उपाध्यक्षही आहेत.