jharkhand news : रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी झारखंडमधील एका कुटुंबावर शोककळा पसरली आहे. घरातील एकुलता एक असलेल्या मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. हा तरुण बेडवर झोपून रसगुल्ला खात होता. यावेळी तो मोबाईलवर गेमही खेळत होता. अचानक रसगुल्ला घशात अडकल्याने त्याचा श्वास रोखला गेला. यामुळे तो तडफडू लागला. थोड्याच वेळात त्याचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना पूर्व सिंहभूममधील गलुडीहच्या पटमाहुलिया गावात घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, अमित सिंह असे मृताचे नाव आहे. तो १७ वर्षांचा होता. झारखंड राज्यातील पतमाहुलिया येथील सुजित सिंग यांचा तो एकुलता एक मुलगा होता. अमित हा घरी असतांना झोपून मोबाईलवर गेम खेळत होता. दरम्यान, तीन महिने बाहेर काम करून घरी परतलेल्या काका रोहिणी सिंग यांनी घरी रसगुल्ला आणला होता. अमितने झोपून रसगुल्ला खाण्यास सुरुवात केली. यावेळी रसगुल्ला अचानक अमितच्या घशात अडकला. त्याच्या श्वास रोखल्या गेल्याने अमितला तडफडू लागला. यावेळी त्याच्या काकांनी प्रयत्न करूनही घशात अडकलेला रसगुल्ला त्यांना बाहेर काढता आला नाही. यानंतर त्याला उलट्या झाल्या व त्याचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्याकहा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
माहिती मिळताच पोलिस निरीक्षक पंकज महतो ही मुलाच्या घरी पोहोचले. त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली. घटना घडली तेव्हा अमित सिंगचे वडील सुजित सिंग हे पंचायत समितीमध्ये गेले होते. मुलाच्या मृत्यूमुळे आई उर्मिला सिंग हिने टाहो फोडला असून सतत रडत असल्याने तिची प्रकृती वाईट झाली आहे. अमित हा त्यांच्या एकुलता एक मुलगा होता. तर बहीण त्याच्यापेक्षा लहान आहे. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधी ही घटना घडल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
दुसऱ्या एका घटनेत हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेसच्या स्लीपर कोचच्या टॉयलेटमध्ये पडून महिला प्रवाशाचा मृत्यू झाला. रत्ना (वय ८५) असे मृत्यू झालेल्या वृद्ध प्रवासी महिलेचे नाव आहे. ही महिला टाटानगर स्थानकावर बेशुद्ध पडल्याची माहिती रेल्वे ड्युटी कर्मचाऱ्यांनी दिली होती, मात्र रेल्वे रुग्णालयाच्या डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर तिला मृत घोषित करण्यात आले.