jharkhand News : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हेमंत सोरेन यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय व माजी पीए सुनील श्रीवास्तव आणि इतरांच्या घरांवर आयकर विभागाने छापेमारी केली आहे. रांची आणि जमशेदपूरसह ९ ठिकाणी हे छापे टाकण्यात आले आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.
सुनील हे मुख्यमंत्री सोरेन यांचे स्वीय सल्लागार आहेत. या छाप्यात प्राप्तिकर विभागाने घराची कसून तपासणी केली आहे. तपास अधिकाऱ्यांनी घरातून काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली आहे. ही कारवाई महत्त्वाच्या तपासाशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यापूर्वी १४ ऑक्टोबर रोजी ईडीच्या पथकाने जलजीवन मिशनमधील घोटाळ्याप्रकरणी हेमंत कॅबिनेट मंत्री मिथलेश ठाकूर यांचे बंधू विनय ठाकूर, खासगी सचिव हरेंद्र सिंह यांच्यासह अनेक अभियंत्यांच्या घरांवर छापे टाकले होते.
झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने जूनमध्ये जामीन मंजूर केला होता. अंमलबजावणी संचालनालयाने ३१ जानेवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री सोरेन यांची सात तास चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली होती. यानंतर हेमंत सोरेन यांनी राजभवनात जाऊन मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
काँग्रेस नेते राकेश सिन्हा यांनी हेमंत सोरेन यांच्या निकटवर्तीयांच्या घरावर आयकर विभागाने टाकलेल्या छाप्याबाबत म्हटले आहे की, विरोधी पक्षनेत्यांवर दबाव आणण्यासाठीच ही कारवाई केली जात आहे. झारखंडसाठी ही काही नवी गोष्ट नाही. राज्यातील विरोधी पक्षनेते आणि त्यांच्या खासगी कर्मचाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे सातत्याने पडत आहेत. भाजप आता प्राप्तिकर आणि ईडीच्या छाप्यांद्वारेच आपले स्थान भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहे. इथल्या जनतेने त्यांना आधीच नाकारले आहे. अशी कारवाई करून ते केवळ विरोधी पक्षनेत्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. '