झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थापन करणार सरकार? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थापन करणार सरकार? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थापन करणार सरकार? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा

Nov 20, 2024 08:24 PM IST

Jharkhand Election Exit Poll Results 2024: झारखंड विधानसभा निवडणुकीचे मतदान संपले आहे. २३ नोव्हेंबररोजी निकाल जाहीर होणार आहे. आता एक्झिट पोलच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या रिपोर्टमध्ये एक्झिट पोल काय म्हणतो जाणून घ्या...

झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थानप करणार सरकार? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा की भाजप युती? कोण स्थानप करणार सरकार? एक्झिट पोलमध्ये मोठा खुलासा

Jharkhand Election Exit Poll Results 2024: झारखंडमधील विधानसभा निवडणुकीचा दुसरा टप्पा आज (२० नोव्हेंबर) रोजी पार पडला. ही निवडणूक प्रामुख्याने रोजगार, विकास, महागाई, भ्रष्टाचार, घराणेशाही, घुसखोरी या मुद्द्यांवर लढली गेली. मतदान संपले असून उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सील झाले आहे. झारखंडच्या ८१ सदस्यीय विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर होणार असून त्यापूर्वीच एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोलमध्ये कोणता पक्ष सरकार स्थापन करणार 'या' विषयी जाणून घेऊयात.

झारखंडमध्ये प्रामुख्याने एनडीए विरुद्ध इंडिया आघाडी अशी लढत पाहायला मिळाली. एनडीएमध्ये भाजप, ऑल झारखंड युवा मोर्चा, जेडीयू, लोकजन शक्ति पार्टी या पक्षांचा समावेश आहे. तर इंडिया आघाडीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, आरजेडी, सीपीआय एमएल या पक्षांचा समावेश आहे.

मॅट्रिझ एक्झिटचा एक्झिट पोल काय सांगतो ?

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १२ जिल्ह्यांतील ३८ जागांसाठी बुधवारी सायंकाळी पाच वाजता मतदान पार पडले. २०१९ च्या झारखंड निवडणुकीत काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चाचा समावेश असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडीने (यूपीए) विजय मिळवला होता. झामुमोला ३०, भाजपला २५ आणि काँग्रेसला १६ जागा मिळाल्या होत्या

मॅट्रिक्सच्या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार यावेळी झारखंडमध्ये भाजपप्रणित एनडीए सरकार स्थापन करू शकते. मॅट्रिझ एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार झारखंडमधील ८१ जागांपैकी एनडीएला ४६ आणि इंडिया आघाडीला २९ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ६ जागा इतरांच्या खात्यात जाऊ शकतात.

गेल्या वर्षीच्या एक्झिट पोलमध्ये इंडिया टुडे-अॅक्सिस माय इंडियाने झामुमो-काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीएला ४३ जागा दिल्या होत्या, तर भाजपला २७ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. दुसरीकडे एबीपी-सीच्या पोलमध्ये मतदारांनी त्रिशंकू विधानसभेचा अंदाज वर्तवत यूपीएला ३५ आणि भाजपला ३२ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवला होता. तर टाइम्स नाऊने यूपीएला ४४ आणि भाजपला २८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवला होता.

मताधिक्य मिळवूनही भाजपचा झाला होता पराभव

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकली तर मताधिक्य मिळूनही भाजप इतर पक्षाच्या तुलनेत मागे पडला होता. ३३.३७ टक्के मते मिळवूनही केवळ २५ जागांवर भाजपला विजय मिळवता आला, तर जेएमएमने, १८.७२ टक्के मते मिळवूनही ३० जागा जिंकल्या होत्या. त्यामुळे या निवडणुकीत देखील मतदानाची अधिकची आकडेवारी ही महत्वाची भूमिका बजावणार आहे.

झारखंडमध्ये ६८ टक्के मतदानाची नोंद

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यात बुधवारी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ३८ मतदारसंघांमध्ये सुमारे ६८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. १२ जिल्ह्यांतील १४२१८ मतदान केंद्रांवर सकाळी ७ वाजता मतदान सुरू झाले आणि सायंकाळी ५ वाजता मतदान संपले, तर ३१ मतदान केंद्रांवर मतदान सायंकाळी ४ वाजता संपले. मात्र, या सर्व केंद्रांवर नियोजित मतदान पूर्ण होण्यापूर्वी रांगेत उभ्या असलेल्या लोकांना मतदान करण्याची मुभा देण्यात आली होती.

अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार कुणाला किती जागा ?

अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये 'इंडिया' आघाडीचे सरकार स्थापन होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. इंडिया आघाडी जादुई आकडा ओलांडताना दिसत आहे. इंडिया आघाडी ही ५३ जागा तर एनडीए २५ जगा जिंकण्याची शक्यता आहे. तर जेएलकेएमला दोन आणि इतरांना एक जागा मिळण्याचा अंदाज या एक्जिट पोलने वर्तवला आहे.

पीपल्स पल्सच्या एक्झिट मध्ये भाजप आघाडी 50 च्या वर असल्याचे दाखवण्यात आले आहे. एनडीए आघाडीला जास्तीत जास्त ५३ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत.

पीपल्स पल्सचे एक्झिट पोलचे आकडे बरोबर ठरले तर झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजदला मोठा धक्का बसू शकतो. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील सरकारची राजवट संपुष्टात येऊ शकते.

पीपल्स पल्सच्या एक्जिट पोल काय सांगतो ?

पीपल्स पल्सच्या अंदाजानुसार भाजपला ४२ ते ४८ जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजपचा मित्रपक्ष आजसूला २ ते ५ जागा मिळू शकतात. तर इंडिया सर्वात मोठा पक्ष असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला १६ ते २३ जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला ८ ते १४ तर इतरांना ६ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे.

स्त्रोत - पीपल्स पल्स

भाजप - ४२-४८

आजसू - २-५

काँग्रेस - ८-१४

झामुमो - १६-२३

ओटीएच - ६-१०

झी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकारची शक्यता

झी न्यूजच्या एक्झिट पोलमध्ये झारखंडमध्ये एनडीए आणि 'इंडिया' आघाडीयांच्यात चुरशीची लढत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलनुसार झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद आघाडीला ३९ ते ४४ जागा मिळू शकतात. भाजपला ३६ ते ४१ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर इतरांना ३ जागा मिळू शकतात.

चाणक्य स्ट्रॅटेजीज एक्झिट पोल काय सांगतो ?

चाणक्य स्ट्रॅटेजीजच्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार इंडिया आघाडीला ३५ ते ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपप्रणित एनडीएला ४५ ते ५० जागा मिळण्याचा अंदाज आहे. इतरांना ३ ते ५ जागा मिळण्याची शक्यता आहे. झामुमोला २६ तर काँग्रेसला १० पेक्षा जास्त जागा मिळण्याची शक्यता आहे. तर एकट्या भाजपला ४० पेक्षा जास्त जागा मिळू शकतात, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Whats_app_banner
विभाग
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर