मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  रक्ताने हात माखलेल्या गुन्हेगाराला मोदींनी मिठी मारली; नरेंद्र मोदी आणि पुतिन गळाभेटीवर झेलेन्स्की संतापले

रक्ताने हात माखलेल्या गुन्हेगाराला मोदींनी मिठी मारली; नरेंद्र मोदी आणि पुतिन गळाभेटीवर झेलेन्स्की संतापले

Jul 09, 2024 02:10 PM IST

Jelensky on PM Narendra Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशिया दौऱ्यावर गेले आहेत. या दौऱ्यात पीएम मोदींचे भव्य स्वागत पुतीन यांनी केले. दरम्यान दोघांनी गळाभेट घेतली असून यावर यूक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी टीका केली आहे. त्यांनी या घटनेला दु:खद म्हटले आहे.

''रक्ताने हात माखलेल्या गुन्हेगाराला मोदी यांनी मिठी मारली''; पीएम मोदी आणि पुतिन यांच्या भेटीने झेलेन्स्की संतापले
''रक्ताने हात माखलेल्या गुन्हेगाराला मोदी यांनी मिठी मारली''; पीएम मोदी आणि पुतिन यांच्या भेटीने झेलेन्स्की संतापले

Jelensky on PM Narendra Modi Russia Visit :  पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशियाच्या दौऱ्यावर आहेत. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मोदी यांचे भव्य स्वागत करत त्यांना मिठी मारली. दोघांच्याही या गळाभेटीवर युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी टीका करत दोन्ही देशांच्या बैठकीबाबत चिंता व्यक्त केली. ही बैठीक सुरू असतांना रशियाने यूक्रेनवर भीषण क्षेपणास्त्र हल्ला केला आहे. यात एका दवाखान्यावर क्षेपणास्त्र पडल्याने ४० लोक ठार झाले. मृतांमध्ये कर्करोग रुग्ण व लहान मुलांचा देखील समावेश आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मोदी आणि पुतीन यांच्या भेटीवर झेलेन्स्की यांनी जहरी टीका केली आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, 'ज्यावेळी रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे, अशा वेळी जगातील सर्वात मोठ्या लोकशाही असलेल्या देशाच्या पंतप्रधानाने रशियात जाऊन जगातील सर्वात मोठ्या गुन्हेगाराला मिठी मारावी, हे अतिशय दुःखद आहे. शांतता प्रस्थापित करण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांसाठी ही विनाशकारी घटना आहे.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर

भारत आणि रशिया यांच्यातील २२ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी रशियाला पोहोचले आहेत. रशियाकडून पंतप्रधान मोदींना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. अध्यक्ष पुतिन यांनी पंतप्रधानांना त्यांच्या निवासस्थानी रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले, जिथे दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाली. लोकसभा निवडणुकीत विजयाची नोंद केल्याबद्दल पुतिन यांनी पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले, तर रशियाने चर्चेसाठी आमंत्रित केल्याबद्दल मोदींनी राष्ट्रपती पुतीन यांचे आभार मानले.

दोन वर्षांपासून सुरू आहे रशिया युक्रेन युद्ध

फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर हल्ला केला. सुरुवातीला जगाला वाटत होते की युक्रेन लवकरच रशियन सैन्यापुढे शरणागती पत्करेल. पण तसे झाले नाही. युक्रेनने रशियन फौजांना चोख उत्तर दिले आहे. या युद्धादरम्यान पाश्चात्य देशांनीही युक्रेनला मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि शस्त्रास्त्रांची मदत केली. भारताने सुरुवातीपासूनच या युद्धापासून कोणत्याही देशाची बाजू घेतलेली नाही. तसेच हा वाद दोन्ही देशांना मुत्सद्देगिरीने सोडवण्याचा सल्ला दिला. इंडोनेशियातील बाली येथे जी २० बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी पुतीन यांना सांगितले की हा "युद्धाचा काळ नाही." पंतप्रधान मोदींचे हे विधान पाश्चात्य देशांना खूप आवडले होते. या काळात भारताने रशियावर कधीही तीव्र टीका केली नाही. पाश्चिमात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांना न जुमानता भारताने रशियासोबतचे आपले व्यापारी संबंध कायम ठेवले आहे. तसेच भारताने देखील भारताच्या आर्थिक विकासासाठी रशियाशी चांगले संबंध आवश्यक असल्याचे पाश्चात्य देशांना पटवून देण्यात यश मिळवले आहे.

WhatsApp channel