जपानची राजधानी टोकियोच्या विमानतळाच्या धावपट्टीवर उतरलेल्या एका प्रवासी विमानात भयंकर आग लागल्याची घटना घडली आहे. या विमानाने धडक दिलेल्य तटरक्षक दलाच्या छोटेखानी विमानातील ५ जण मृत्युमुखी पडले आहे. मात्र आग लागलेल्या विमानातील सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले आहे. विमानतळावर उभ्या असलेल्या तटरक्षक दलाच्या विमानाला धडक दिल्यामुळे या विमानाला आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
NHK या जपानच्या सरकारी माध्यमाने टोकियोच्या हानेडा विमानतळावर धावपट्टीवर जळत असलेल्या विमानाचे फुटेज प्रसारित केले आहे. विमानाच्या खिडक्यांमधून ज्वाळा बाहेर पडत असल्याचे या दृष्यांमधून दिसत होते. दरम्यान, जपानच्या तटरक्षक दलाचे विमान तेथे उभे होते. या विमानाला टक्कर लागल्याने आग लागली असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे, असं वृत्त निप्पॉन टीव्हीने दिले आहे. हानेडा हे जपानमधील सर्वात व्यस्त विमानतळांपैकी एक आहे.
‘हानेडा विमानतळावर दोन विमानांमध्ये टक्कर झाली की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. पण तटरक्षक दलाच्या विमानाचे या अपघातात नुकसान झाले आहे’, असं हानेडा विमानतळावरील तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्याने एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितले आहे.
आगीत जळालेलं जपान एअरलाइनच्या मालकीचं JAL516 हे विमान होक्काइडो येथील शिन-चिटोसे विमानतळावरून उड्डाण घेतलं होतं. ते टोकियोत लँड झाले होतं. या विमानातून ३६७ प्रवासी, आठ बालके आणि १२ विमानाचे क्रू मेंबर्स प्रवास करत होते. या सर्वांना विमानातून सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं असल्याचं जपान एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने सांगितलं आहे. दरम्यान, विमान धावपट्टीवर उतरत असतानाच ही दुर्घटना घडली असल्याचं वृत्त बीबीसीनं दिलं आहे. या विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.
जपानमध्ये १९८५ साली सर्वात भीषण विमान अपघात झाला होता. टोकियोहून ओसाकाला जाणारे JAL जंबो जेट हे विमान मध्य गुन्मा प्रदेशात पडून झालेल्या अपघातात ५२० प्रवासी ठार झाले होते.