Jharkhand accident News : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी झारखंडमध्ये एक मोठी दुर्घटना घडली. नवीन वर्षांचे जल्लोषात स्वागत करून पिकनिकला जाणाऱ्या तरूणांवर काळाने घाला घातला आहे. जमशेदपूरमधील बिस्तुपूर पोलीस ठाण्यांतर्गत सर्किट हाऊस चौकात सकाळी झालेल्या भीषण अपघातात सहा तरुण मित्र जागीच ठार झाले. सर्व मृतांचे वय २५ ते ३० वर्षांच्या दरम्यान आहे. सर्वजण बाबा आश्रम रोड क्रमांक ५, आदित्यपूर येथील रहिवासी आहेत.
शुभम कुमार झा, शुभम, अनिकेत महातो उर्फ मोनू, सूरज कुमार साह अशी ठार झालेल्या मुलांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भरधाव वेगानं जाणाऱ्या कारवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने कार आधी दुभाजकाला धडकली. यानंतर ती झाडावर जाऊन आदळली. हा अपघात एवढा भीषण होता की, त्याचा आवाज दूरवर ऐकू गेला, यामुळे घरातून लोक बाहेर आले. यानंतर स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली. कारचा चक्काचूर झाल्याने क्रेनच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले.
हे तरुण नवीन वर्षांचे सेलिब्रेशन करून ते पिकनिकला जात होते. यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
पहाटे पाच वाजता सूरज नावाच्या तरुणाच्या गाडीतून सर्वमित्र नवीन वर्षाचे स्वागत करून पिकनिकला जायला निघाले होते. सुरज हा कार चालवत होता. त्यांची कार बिस्तुपूर चौकाजवळ आली असता गाडीवरील सुरजचे नियंत्रण सुटले. यामुळे गाडी थेट दुभाजकाला जाऊन धडकली. यानंतर ती झाडावर आदळली. सकाळी झालेल्या अपघातानंतर त्या परिसरात एकच गोंधळ उडाला. बिस्तुपूर पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सर्वांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सर्व मृतदेह टाटा मेन हॉस्पिटल येथून पोस्टमॉर्टमसाठी एमजीएम मेडिकल कॉलेजमध्ये आणण्यात आले. स्थानिक लोकांनी सांगितले की, हे सर्व युवक मित्र आहेत. रात्री कॉलनीतच नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी त्यांनी पार्टीचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर त्यांनी अचानक पिकनिकला जायचे ठरवले. ते कार मधून निघाले होते. कारमध्ये ७ जण होते. या पैकी ६ मित्र ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
शुभम कुमार झा पत्ता बाबा आश्रम रोड क्रमांक ५ आदित्यपूर, बिहार येथील खगरिया जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो ड्युटीवर असल्याचे सांगून तो पाच वाजता घराबाहेर पडला. शुभम हा मल्टी टेक कंपनीत कामाला होता. अनिकेत महातो उर्फ मोनू हा टाटा मोटर्समध्ये ३ महिन्यांपूर्वी ट्रेनिंग ड्युटीवर कामाला लागला होता. कंपनी ब्लॉक झाल्यामुळे बंद पडली होती, त्यामुळे तो घरी जात होता. तो मूळचा बिहारच्या पाटणा जिल्ह्यातील मोकामा येथील रहिवासी आहे. सूरज कुमार साह, हा टाटा स्टील कंपनीत कार चालवत होता.