जम्मू-काश्मीर रविवारी झालेल्या आणखी एका दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे. श्रीनगरच्या संडे बाजारात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना श्री महाराजा हरिसिंह रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या वेळी रविवारच्या बाजारात चांगलीच गर्दी झाली होती. बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी होती. त्याचवेळी हा हल्ला झाला. ग्रेनेड हल्ल्यानंतर लोक जीव वाचवण्याासाठी सैरावैरा धावू लागले. पर्यटन स्वागत केंद्राजवळील संडे बाजारपेठेत हा हल्ला झाला.
जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील डॉक्टर तानसिन शौकत यांनी दिली. दहशतवादी हल्ल्यानंतर तात्काळ हा परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस आणि लष्कराचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून दहशतवाद्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा निषेध केला आहे. गेल्या काही दिवसांपासून खोऱ्यातील काही भागात हल्ले आणि चकमकीच्या बातम्या येत आहेत. श्रीनगरच्या संडे मार्केटमध्ये निरपराध दुकानदारांवर ग्रेनेड हल्ला झाल्याची आजची बातमी अत्यंत अस्वस्थ करणारी आहे. निरपराध नागरिकांना लक्ष्य करण्याचे कोणतेही औचित्य असू शकत नाही. हल्ल्यांची ही लाट लवकरात लवकर रोखण्यासाठी सुरक्षा यंत्रणेने सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत, जेणेकरून लोकांना कोणत्याही भीतीशिवाय आपले जीवन जगता येईल.
जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर आणि अनंतनाग जिल्ह्यात सुरक्षा दलांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या प्रतिबंधित संघटनेचा एक वरिष्ठ पाकिस्तानी कमांडर आणि अन्य दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. उस्मान असे लष्कर-ए-तोयबाचे नाव असून तो अनेक वर्षांपासून खोऱ्यात सक्रीय होता आणि इन्स्पेक्टर मसरूर वानी यांच्या हत्येतही त्याचा सहभाग होता, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. ऑक्टोबर २०२३ मध्ये ईदगाह मैदानावर क्रिकेट खेळत असताना वानीची जवळून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत चार सुरक्षा रक्षक जखमी झाले आहेत.