मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Anantnag : कपडे न घालताच घराबाहेर जायचं होतं, अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईचा केला निर्घृण खून

Anantnag : कपडे न घालताच घराबाहेर जायचं होतं, अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईचा केला निर्घृण खून

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Dec 23, 2022 04:56 PM IST

Anantnag Crime News : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात अंगावर काटा आणणारी एक घटना घडली आहे.

Crime
Crime (HT_PRINT)

Anantnag Crime News : डोकं चक्रावून टाकणारी एक घटना जम्मू-काश्मीरमध्ये घडली आहे. काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात एका नराधम इसमानं स्वत:च्या जन्मदात्या आईचा निर्घृण खून केल्याचं समोर आलं आहे. इतकंच नव्हे तर भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्यांचाही त्यानं निर्घृण खून केला आहे. पोलिसांनी या माथेफिरूला तात्काळ अटक केली आहे.

जावेद अहमद राथेर असं या माथेफिरू इसमाचं नाव आहे. तो एका बेकरीमध्ये काम करतो. त्यानं बांबूच्या मदतीनं आईवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. जावेदनं त्याच्या आईवर हल्ला केला तेव्हा मोहम्मद अमीन शाह आणि गुलाम नबी खादिम हे दोघे मध्ये पडले. मात्र, जावेदनं त्यांनाही लक्ष्य केलं. त्यांच्यावरही बांबूचे घाव घातले. त्यात त्या दोघांचाही मृत्यू झाला. 

विशेष म्हणजे ही घटना घडण्याच्या एक दिवस आधी पोलिसांनी जावेदला पहलगाममधून ताब्यात घेतलं होतं. तो नग्न होऊन बाजारात फिरत होता. लोकांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करून त्याला कुटुंबीयांच्या स्वाधीन केलं होतं. त्यानंतर पुढील प्रकार घडला.

कपड्यांशिवाय बाहेर जायचे होते!

स्थानिक मीडियानं एका शेजाऱ्याच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, 'जावेद कपडे न घालता घराबाहेर जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र हाफिजा बेगमनं त्याला अशा अवस्थेत घराबाहेर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. आई जाऊ देत नसल्यामुळं तो संतापला आणि त्यानं आईवर हल्ला केला. त्यानंतर दिसेल त्याला लक्ष्य केलं. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

WhatsApp channel

विभाग