Jammu-Kashmir Accident : लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले; ५ जवानांचा मृत्यू, अनेक जखमी
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Jammu-Kashmir Accident : लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले; ५ जवानांचा मृत्यू, अनेक जखमी

Jammu-Kashmir Accident : लष्कराचे वाहन ३०० फूट खोल दरीत कोसळले; ५ जवानांचा मृत्यू, अनेक जखमी

Dec 24, 2024 10:09 PM IST

Jammu Kashmir Accident : जम्मू आणि काश्मीरच्या पूंछ सेक्टरमध्ये मंगळवारी मोठा अपघात झाला. लष्कराचा ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळला. यात पाच जवानांचा मृत्यू झाला. तर अन्य जवान जखमी झाले आहेत.

जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात
जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनाला मोठा अपघात (AFP)

Jammu Kashmir Accident : भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेजवळ  मंगळवारी संध्याकाळी  झालेल्या भीषण अपघातात लष्कराचे ५ जवान शहीद झाले.  तसेच अनेक जवान जखमी झाले.  बलनोई भागात लष्कराचे वाहन जवळपास ३०० फूट  दरीत कोसळल्याने  हा अपघात झाला.  पोलीस  आणि लष्कराच्या  पथकांनी मदतकार्य सुरू केले आहे. 

जम्मू-काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये हा अपघात झाला. लष्कराचा एक ट्रक ३०० फूट खोल दरीत कोसळून ५ जवान ठार तर अनेक जण जखमी झाले. बचाव कार्य सुरू असून जखमी जवानांवर उपचार सुरू असल्याची माहिती व्हाईट नाइट कॉर्प्सने दिली आहे. व्हाईट नाईट कॉर्प्सच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी पुंछ सेक्टरमध्ये ऑपरेशनल ड्युटीवर असताना झालेल्या वाहन अपघातात ५ शूर जवानांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूंछ जिल्ह्यात मंगळवारी संध्याकाळी एक वाहन रस्त्यावरून घसरून खड्ड्यात कोसळले. लष्कराचा ट्रक बनोईकडे जात असताना घरोआ भागात हा अपघात झाला. सुमारे ३०० ते ३५० फूट खोल दरीत गाडी कोसळल्याची माहिती सूत्रांनी दिली. बचावकार्यासाठी लष्कर आणि पोलिसांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. जखमी जवानांची संख्या ५ असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृत जवानांबाबत अधिक माहितीची प्रतीक्षा आहे.

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वाड्रा यांनी ५ जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. खर्गे यांनी म्हटले की, 'जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात झालेल्या वाहन अपघातात लष्कराचे पाच शूर जवान शहीद झाल्याच्या भीषण बातमीने अत्यंत दु:ख झाले आहे. आमच्या शूर जवानांच्या कुटुंबियांप्रती आमची संवेदना आहे. त्यांच्या त्यागाला आणि देशसेवेला आम्ही सलाम करतो. आमच्या संवेदना जखमींसोबत आहेत आणि त्यांना लवकर आणि पूर्ण बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.

प्रियंका गांधी यांनी एक्सवर म्हटले की, जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे लष्कराचे वाहन दरीत कोसळून अनेक जवान शहीद झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. ईश्वर दिवंगत आत्म्याला शांती देवो. शोक संतप्त कुटुंबियांप्रती माझी तीव्र संवेदना आहे. जखमी जवान लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना. शहीद जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचे आम्ही सदैव ऋणी राहू. भावपूर्ण श्रद्धांजली.

काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा जिल्ह्यात बर्फाच्छादित गुरेज रस्त्यावर गाडी घसरून दरीत कोसळली होती. या घटनेत दोन जवान जखमी झाले आहेत. बर्फाच्छादित जडीकुशी-गुरेज रस्त्यावर हा अपघात झाल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली. जवानांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. लष्कर आणि नागरी अधिकाऱ्यांनी तातडीने बर्फ आणि थंडीचा सामना करत बचावकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर