election results : शिखराहून पायथ्यापर्यंत… जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पक्ष पीडीपीचा दारुण पराभव, इल्तिजा मुफ्तींनाही धक्का
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  election results : शिखराहून पायथ्यापर्यंत… जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पक्ष पीडीपीचा दारुण पराभव, इल्तिजा मुफ्तींनाही धक्का

election results : शिखराहून पायथ्यापर्यंत… जम्मू-काश्मीरमधील प्रमुख पक्ष पीडीपीचा दारुण पराभव, इल्तिजा मुफ्तींनाही धक्का

Oct 08, 2024 03:17 PM IST

iltija Mufti defeat : जम्मू-काश्मीरमध्ये भाजपनं आपलं वजन राखलं असलं तरी याआधीचा सत्ताधारी पक्ष पीडीपीची वाताहत झाली आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीची वाताहत! मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीनं मान्य केला पराभव
जम्मू-काश्मीरमध्ये पीडीपीची वाताहत! मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलीनं मान्य केला पराभव

Jammu Kashmir : हरयाणासोबतच झालेल्या जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकाल आज घोषित होत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार, काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आघाडीनं निर्णायक आघाडी घेतली आहे. दुसऱ्या क्रमांकावर भाजप आहे. तर, राज्यातील एक प्रमुख पक्ष असलेल्या पीडीपीची पुरती वाताहत झाली आहे. माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या मुलगीही पराभवाच्या उंबरठ्यावर आहे.

केंद्रात नरेंद्र मोदी यांचं सरकार दुसऱ्यांदा आल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम रद्द करून तिथं राष्ट्रपती राजवट लावण्यात आली होती. तसंच, या राज्यातून लडाख हा प्रदेश वगळून त्याला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला होता. जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती निवळल्यानंतर तिथं विधानसभा निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला. त्यानुसार निवडणुकीची घोषणा झाली. मतदानाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रपती राजवट लागू होण्याआधी मुफ्ती यांच्या पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टी (PDP) सोबत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षानं या निवडणुकीच्या माध्यमातून राज्यात सत्तेत येण्याचा प्रयत्न चालवला होता. तो अपयशी ठरला असला तरी भाजपला चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत. मात्र, पीडीपीला दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

पीडीपीला मोठा धक्का

पीडीपीनं माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना स्वत:चीही जागा राखता आलेली नाही. त्यांचा पक्ष अवघ्या दोन जागांवर आघाडीवर आहे. सहा फेऱ्यांच्या मतमोजणीनंतर सिरगुफवारा-बिजबेहरा मतदारसंघात इल्तिजा मुफ्ती ४,३३४ मतांनी पिछाडीवर पडल्या. त्यामुळं त्यांनी पराभव मान्य केला. नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार बशीर अहमद वीरी हे १७,६१५ मतं घेऊन आघाडीवर होते. अद्याप मतमोजणीच्या सहा फेऱ्या बाकी आहेत.

काय म्हणाल्या इल्तिजा मुफ्ती?

‘जनतेचा निर्णय मला मान्य आहे. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेलं प्रेम आणि आपुलकी कायम माझ्यासोबत राहील. या संपूर्ण निवडणुकीत प्रचंड कष्ट घेणाऱ्या माझ्या पीडीपी कार्यकर्त्यांचे आभार,’ असं इल्तिजा यांनी 'एक्स'वरील पोस्टमध्ये म्हटलं आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर