जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. किश्तवाडच्या चतरू भागात सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली तेव्हा चकमक सुरू झाली. दुसऱ्या चकमकीत कठुआ जिल्ह्यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. ही चकमक अजूनही सुरू असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये येत्या १८ तारखेला विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी दहशतवादी निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. डोडा, किश्तवाड आणि रामबन जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी १८ सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग, पुलवामा, शोपियान आणि कुलगाम जिल्ह्यातील १६ जागांसाठी मतदान होणार आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, किश्तवाड जिल्ह्यात शुक्रवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. नैदगाम गावाच्या वरच्या भागात चतरू पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिंगनाल दुगड्डा जंगल परिसरात ही चकमक सुरू आहे.
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट शहरात पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला करत तो ध्वस्त केला. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले की, १२ सप्टेंबर २०२४ रोजी मिळालेल्या गोपीनीय माहितीच्या आधारे पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफने चमर्ड सुरनकोटच्या सामान्य भागात संयुक्त शोध मोहीम राबवली.
सुरक्षा दलाकडून परिसराला घेराव घालून टार्गेट एरियाचा शोध घेण्यात आला. शोधा दरम्यान लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले. घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवादी पळून गेले. यानंतर अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला असून संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला आहे. या शोधादरम्यान सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे तळ ध्वस्त करत काही शस्त्रे, दारुगोळा आणि खाद्यपदार्थ जप्त केले.