jammu and Kashmir : दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  jammu and Kashmir : दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या

jammu and Kashmir : दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या

Nov 08, 2024 12:07 AM IST

Jammu Kashmir Encounter : गावामध्ये दहशतवाद्यांनी हल्लाकरतगाव रक्षण समितीच्या दोन सदस्यांची हत्याकेली.हत्या करण्यापूर्वी दोघांना खूप त्रास देण्यात आला होता.

दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला (संग्रहित छायाचित्र)
दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला (संग्रहित छायाचित्र)

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून स्थानिक नागरिकांच्या हत्येचे सत्र सुरूच आहे. एका गावामध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करत गाव रक्षण समितीच्या दोन सदस्यांची हत्या केली. हत्या करण्यापूर्वी दोघांना शारीरिक इजा पोहोचवली होती. याचे फोटोही दहशतवाद्यांनी व्हायरल केले आहेत. पोलीस आणि सैन्याने शोधमोहिम सुरु केली असून वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत. 

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेची शाखा असलेल्या 'काश्मीर टायगर्स'ने गुरुवारी सकाळी केलेल्या हल्ल्यात व्हिलेज डिफेन्स गार्डचे (व्हीडीजी) दोन सदस्य ठार झाले. दहशतवाद्यांनी नजीर अहमद आणि कुलदीप कुमार यांची हत्या केली आहे. दोघेही किश्तवाडमधील ओहली कुंतवाडा येथील रहिवासी होते. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ओहली-कुंतवाडा येथील रहिवासी नजीर अहमद आणि कुलदीप कुमार गुरुवारी सकाळी अधवारी परिसरातील मुंजाला धार जंगलात जनावरे चारण्यासाठी गेले होते, परंतु ते परत आले नाहीत. सायंकाळी अहमद आणि कुमार आपल्या घरी न परतल्याने पोलिसांच्या पथकांनी तेथे शोधमोहीम सुरू केली.

पाकिस्तानातून कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित 'काश्मीर टायगर्स'ने या हत्यांची जबाबदारी स्वीकारली आहे. या घटनेवर प्रतिक्रिया देताना नायब राज्यपाल मनोज सिन्हा म्हणाले की, आम्ही सर्व दहशतवादी संघटनांचा नायनाट करण्याचा आणि या क्रूर कृत्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ.

कुलदीप कुमार आणि नजीर अहमद हे व्हिलेज डिफेन्स गार्डचे सक्रिय सदस्य होते. ते आज सकाळी घनदाट जंगलात दहशतवाद्यांचा पाठलाग करत होते. दहशतवाद्यांनी सुरुवातीला त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, पण जेव्हा ते खूप जवळ आले तेव्हा त्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अडवून ठार मारण्यात आले. ग्रामरक्षक दलात भरती होण्याचा विचार करणाऱ्यांना ही घटना इशारा आहे, अन्यथा त्यांनाही त्याच परिणामांना सामोरे जावे लागेल.

त्याच दिवशी संध्याकाळी उत्तर काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोरमध्ये सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली तेव्हा दहशतवाद्यांशी चकमक झाली. दरम्यान, उत्तर काश्मीरमधील सोपोरमधील सगीपोरा भागात सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान गोळीबाराचा आवाज ऐकला.

विशेष माहितीच्या आधारे पोलिस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने सगीपोरा येथे शोधमोहीम सुरू केली, अशी माहिती एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दिली. शोधादरम्यान गोळीबाराच्या घटना घडल्या, त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची शक्यता असून सध्या चकमक सुरू आहे.

Whats_app_banner
देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर