प्रसिद्ध जैन मुनी आचार्य विद्यासागर महाराज यांचे रविवारी पहाटे छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी तीर्थ येथे निधन झाले. त्यांनी वयाच्या ७७ वर्षी अखेरचा श्वास घेतला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
'आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज जी यांच्या असंख्य भक्तांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. समाजातील त्यांचे अमूल्य योगदान, विशेषत: लोकांमध्ये आध्यात्मिक जागृतीसाठी त्यांनी केलेले प्रयत्न, दारिद्र्य निर्मूलन, आरोग्यसेवा, शिक्षण आणि इतर अनेक गोष्टींसाठी त्यांनी केलेले कार्य पुढील पिढ्या लक्षात ठेवतील, असे मोदी यांनी एक्सवर लिहिले आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमधील राजनंदगाव जिल्ह्यातील डोंगरगड येथे जाऊन आचार्य विद्यासागर महाराज यांची भेट घेतली होती. डोंगरगडमधील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या माँ बामलेश्वरी मंदिरातही मोदींनी पूजा केली होती.
“वर्षानुवर्षे त्यांचे आशीर्वाद घेण्याचा मान मला मिळाला. गेल्या वर्षी छत्तीसगडमधील डोंगरगड येथील चंद्रगिरी जैन मंदिराला दिलेली भेट मी कधीच विसरू शकत नाही. त्यावेळी मी आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज जी यांच्यासोबत वेळ घालवला होता आणि त्यांचे आशीर्वादही घेतले होते”, असेही मोदी यांनी म्हटले आहे.
भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी एक्सवर हिंदीत लिहिलेल्या पोस्टमध्ये त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. परमपूज्य संत शिरोमणी आचार्य श्री १०८ विद्यासागर जी महाराज यांच्या निधनाची बातमी ऐकून मला धक्का बसला आहे. जैन धर्माच्या अमूल्य आध्यात्मिक वारशाला त्यांनी नवे आयाम दिले आहेत. ज्ञान, करुणा आणि सदिच्छेने परिपूर्ण असलेली त्यांची शिकवण आपल्याला समाज आणि संस्कृतीच्या प्रगतीसाठी नेहमीच मार्गदर्शन देत राहील. मी समाधीस्थ आचार्य श्रींच्या चरणी नतमस्तक आहे, असे नड्डा यांनी म्हटले आहे.