मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Pakistan Election: जेलमध्ये कैद असलेल्या इम्रान खानने AIद्वारे निर्मित व्हिडिओतून केला बहुमताचा दावा

Pakistan Election: जेलमध्ये कैद असलेल्या इम्रान खानने AIद्वारे निर्मित व्हिडिओतून केला बहुमताचा दावा

Haaris Rahim Shaikh HT Marathi
Feb 10, 2024 12:17 PM IST

सध्या जेलमध्ये बंद असलेला पाकिस्तानचा माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांशी संवाद साधण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा Artificial Intelligence चा वापर करून एक व्हिडिओ जारी केला आहे. खान यांनी व्हिडिओच्या माध्यमातून पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे

Former Pakistani prime minister Imran Khan
Former Pakistani prime minister Imran Khan (REUTERS)

पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीचे संपूर्ण, अधिकृत निकाल जाहीर होण्याआधीच विजयाचे दावे प्रतिदावे करण्यास सुरूवात झाली आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी त्यांच्या पक्षाने निवडणूक जिंकल्याचा दावा केल्यानंतर काही तासांतच जेलमध्ये बंद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून व्हिडिओ संदेश जारी केला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून इम्रान खान यांनी २०२४च्या पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयाचा दावा केला आहे. आपल्या अधिकृत X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर इम्रान खान यांनी हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.

या व्हिडिओ संदेशात इम्रान खान यांनी आपल्या समर्थकांना विजयाचा आनंद साजरा करण्याचे आवाहन केले आहे. खान यांनी या व्हिडिओ संदेशातून नवाझ शरीफ यांचा विजयाचा दावा फेटाळून लावला आहे. या निकालाने सत्ताधाऱ्यांना घाबरवले असल्याचे इम्रान खान यांनी या व्हिडिओ संदेशात म्हटले आहे.

या व्हिडिओत इम्रान खान म्हणतात, 'माझ्या प्रिय देशवासियांनो, एवढ्या मोठ्या संख्येने मतदान करून आपल्या लोकशाही हक्काचा वापर करून नागरिकांचे अधिकार वापरण्याचे स्वातंत्र्य पुन्हा बहाल करण्यासाठी पाया रचला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मदत केल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो... नवाझ शरीफ हे कमी बुद्धिमत्तेचे नेते असून त्यांचा पक्ष ३० जागांवर पिछाडीवर असूनही ते विजयाचा दावा करत आहेत… कोणताही पाकिस्तानी नागरिक हे (निवडणुकीतील गैरप्रकार) मान्य करणार नाही. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनीही याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे. (तुम्हाला) घाबरण्याची गरज नाही... विजयाचा आनंद साजरा करा... दोन वर्षांच्या प्रचंड दडपशाही आणि अन्यायानंतरही आम्ही २०२४ ची निवडणूक पूर्ण ताकदीनिशी जिंकली आहे…’ असं इम्रान खान या व्हिडिओत बोलताना दिसत आहेत.

पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf - PTI) पक्षावर निवडणूक लढवण्यास बंदी असून आत्तापर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf - PTI) समर्थिक अपक्ष उमेदवारांनी सर्वाधिक म्हणजे २४५ पैकी ९८ जागा जिंकल्या आहेत. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पाकिस्तान मुस्लिम लिग (एन) (Pakistan Muslim League (N) आणि बिलावल भुट्टो-झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीला (पीपीपी) (Pakistan Peoples Party-PPP) पक्षाला अनुक्रमे ६९ आणि ५१ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान, नवाझ शरीफ यांनी मात्र या निवडणुकीत पीएमएल-एन हा सर्वात मोठा पक्ष ठरला असल्याचे सांगत विजयाचा दावा केला आहे. 'पाकिस्तान मुस्लीम लीग हा आज निवडणुकीनंतर देशातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या देशाला चक्रव्यूहातून बाहेर काढणे हे आमचे कर्तव्य आहे, असं शरीफ यांनी लाहोरमधील त्यांच्या निवासस्थानाबाहेर जमलेल्या समर्थकांना संबोधित करताना सांगितले.

आपल्या पक्षाकडे पुरेसे बहुमत नसल्याची कबुली देत नवाझ शरीफ यांनी पाकिस्तानात सत्ता स्थापनेसाठी आघाडीत सामील होण्याचे मित्रपक्षांना आमंत्रण दिले आहे. ‘आम्हाला जर स्पष्ट बहुमत मिळाले असते आणि आमच्या पक्षाने स्वबळावर सरकार स्थापन केले असते तर बरे झाले असते. पण तरीही आम्ही इतर पक्षांना आमच्यासोबत येऊन संयुक्त सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण देत आहोत.’ असं नवाझ शरीफ यांनी समर्थकांना सांगितले.

WhatsApp channel

संबंधित बातम्या