ISRO News : भारत प्रथमच स्वदेशी रॉकेटचा वापर करून अंतराळात जैविक प्रयोग करणार आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे (पीएसएलव्ही) पुढील प्रक्षेपण अंतराळात एक नव्हे तर तीन जैविक प्रयोग करणार आहे. यामध्ये सजीव पेशी अंतराळात पाठवण्यात येणार आहे. अंतराळातील अत्यंत आव्हानात्मक वातावरणात या गोष्टी जिवंत ठेवणे हे इस्रोच्या शास्त्रज्ञांपुढे आव्हानात्मक काम राहणार आहे.
पीएसएलव्हीच्या माध्यमातून वाहतूक करण्यात येणाऱ्या सेंद्रिय वस्तूंमध्ये पालक, लोबीया आणि बॅक्टेरिया सारख्या गोष्टींचा समावेश आहे. इस्रोने याला पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल-४ (पीओएम-४) असे नाव दिले आहे. अशा तऱ्हेने इस्रो अंतराळ विश्वात एक मोठा विक्रम करण्याच्या तयारीत आहे. इस्रोचा हा प्रयोग गगनयान मोहिमेतही उपयुक्त ठरणार असल्याचे बोलले जात आहे.
अंतराळात सजीव वस्तु जिवंत ठेवणे मोठे आव्हानात्मक काम असतं. कारण सर्व सर्व वस्तु लाईफ सपोर्ट सिस्टीम सीलबंद बॉक्समध्ये ठेवाव्या लागतात. पीएसएलव्हीचा हा चौथा टप्पा आहे. वास्तविक अंतराळात सजीवांना पाठवून त्यांच्यावर काय परिणाम होतात याचा अभ्यास इस्रो या मोहिमेतून करणार आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉ. एस. सोमनाथ म्हणाले की, इस्रो पहिल्यांदाच अंतराळात असा प्रयोग करणार आहे. पीएसएलव्ही प्रक्षेपकाचा वापर करून भारतीय सजीव अंतराळातील प्रतिकूल वातावरणात कसे टिकून राहतील याचा अभ्यास करणार आहेत.
इस्रोची ही छोटीशी जैविक मोहीम असून, त्याचा फायदा गगनयान मोहिमेत भारताला होणार आहे. गगनयान मोहिमेअंतर्गत भारतीय अंतराळवीरांना भारतीय रॉकेटमधून अंतराळात पाठवले जाणार आहे. ही भारताची पहिली मानव मोहीम असणार आहे. त्याचबरोबर २०३५ पर्यंत अंतराळात भारतीय अंतराळ स्थानक देखील तयार करण्याची भारताची मनीषा आहे. या साठी विविध प्रयोग व प्रकल्प इस्रोमार्फत हाती घेतले जाणार आहे. विशेष म्हणजे पीएसएलव्हीची पुढची मोहीम सी-६० आहे. ही देखील एक अत्यंत प्रायोगिक मोहीम आहे, ज्याचा मुख्य वापर स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट (स्पेडेक्स) आहे. याअंतर्गत इस्रो पहिल्यांदाच दोन भारतीय उपग्रहांचे अंतराळात डॉकिंग आणि अनडॉकिंग करणार आहे.
अंतराळातील शून्य गुरुत्वाकर्षणाच्या वातावरणात पेशी कशा प्रकारे काम करतात, याची चाचणी मुंबईतील अॅमिटी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ करणार आहे. बेंगळुरूच्या आरव्ही कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे यूजीचे विद्यार्थी आतड्यातील जीवाणूंचा वापर करून भारतातील पहिले मायक्रोबायोलॉजिकल पेलोड आरव्हीसॅट -१ अंतराळात पाठवणार आहेत. आतड्याचे बॅक्टेरिया बंद कॅप्सूलमध्ये अंतराळात पाठवले जाणार आहे. याशिवाय, इस्रोच्या विक्रम साराभाई अंतराळ केंद्र (व्हीएसएससी), तिरुवनंतपुरमची एक इन-हाऊस टीम कॉम्पॅक्ट रिसर्च मॉड्यूल फॉर ऑर्बिटल प्लांट स्टडीज (क्रॉप्स) चा वापर करून अंतराळातील जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षण वातावरणात बियाणे आणि पाने कशी उगवतात याची देखील माहिती घेतली जाणार आहे.
संबंधित बातम्या