ISRO Chairman : इस्रोमध्ये खांदेपालट! शास्त्रज्ञ व्ही नारायणन नवे प्रमुख; १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  ISRO Chairman : इस्रोमध्ये खांदेपालट! शास्त्रज्ञ व्ही नारायणन नवे प्रमुख; १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार

ISRO Chairman : इस्रोमध्ये खांदेपालट! शास्त्रज्ञ व्ही नारायणन नवे प्रमुख; १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार

Jan 08, 2025 11:20 AM IST

ISRO New Chairman V Narayanan: डॉ. व्ही. नारायणन हे विज्ञान क्षेत्रातील मोठं नाव आहे. सध्या ते एलपीएससी म्हणजेच लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे संचालक आहेत. आपल्या चार दशकांच्या अनुभवाने त्यांनी भारतीय अंतराळ संघटनेत अनेक महत्त्वाची पद भूषविली आहेत.

इस्रोमध्ये खांदेपालट! शास्त्रज्ञ व्ही नारायणन नवे प्रमुख; १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार
इस्रोमध्ये खांदेपालट! शास्त्रज्ञ व्ही नारायणन नवे प्रमुख; १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार (LPSC)

ISRO New Chairman V Narayanan: चांद्रयान-३ च्या रूपाने भारताला ऐतिहासिक यश मिळवून देणारे इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांचा इस्रो प्रमुख म्हणून कार्यकाळ १४ जानेवारीला संपत आहे.  भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या नव्या प्रमुखाची घोषणा केंद्र सरकारने केली असून जेष्ठ शास्त्रज्ञ  डॉ. व्ही. नारायणन हे इस्रोची धुरा आता सांभाळणार आहेत.  

 भारत सरकारने  डॉ. व्ही. नारायणन यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे नवीन अध्यक्ष म्हणून घोषणा केली. ते  १४ जानेवारीला एस सोमनाथ यांची जागा घेतील. या सोबतच ते अवकाश विभागाचे सचिवपदही सांभाळतील. नियुक्ती समितीच्या आदेशानुसार व्ही नारायणन पुढील दोन वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत ही दोन्ही महत्त्वाची पदे सांभाळणार आहेत.   

नारायण यांच्या निवडीमुळे इस्रोच्या इतिहासात आणखी एक महत्त्वाचा बदल झाला आहे. हा बदल  भारतीय अवकाश कार्यक्रमाच्या भविष्याला नवी दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.  व्ही नारायणन यांची नियुक्ती हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.  कारण त्यांचा भारतीय अवकाश क्षेत्रातील अनुभव आणि योगदान उल्लेखनीय आहे. ते एक प्रख्यात शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली इस्रो आणखी नवी उंची गाठणार आहे. 

कोण आहेत व्ही नारायणन?

व्ही नारायणन यांना  रॉकेट आणि स्पेसक्राफ्ट प्रोपल्शन क्षेत्रात  जवळपास चार दशकांचा अनुभव आहे. नारायणन हे  एक प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित शास्त्रज्ञ आहेत. १९८४ मध्ये ते भारतीय अंतराळ संस्थेत (इस्रो) रुजू झाले.  त्यांनी अनेक महत्त्वाच्या भूमिका पार पाडल्या आहेत. तसेच अनेक अवकाश मोहिमांमध्ये त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. सध्या ते  लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर (LPSC) चे संचालक म्हणून काम करत आहेत, जे इस्रोचे एक प्रमुख केंद्र आहे.

नारायणन यांनी एरोस्पेस इंजिनीअरिंगमध्ये पीएचडी केली आहे. त्यांच्या नेतृत्वात जीएसएलव्ही एमके आयएल या प्रक्षेपकाचे  सी २५ क्रायोजेनिक तयार करण्यात आलं आहे. ते या प्रकल्पाचे प्रकल्प संचालक होते. डॉ. नारायणन  सुरुवातीच्या टप्प्यात विक्रम साराभाई अंतराळ केंद्रात साऊंडिंग रॉकेट, ऑगमेंटेड सॅटेलाइट लाँच व्हेईकल आणि पोलर सॅटेलाईट लाँच व्हेईकलच्या सॉलिड प्रोपल्शन क्षेत्रात त्यांनी काम केले. त्यांनी १९८९ मध्ये आयआयटी खरगपूरमधून क्रायोजेनिक इंजिनीअरिंगमध्ये एमटेक पूर्ण केले.

ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट कौन्सिल-स्पेस ट्रान्सपोर्टेशन सिस्टिमचे (पीएमसी-एसटीएस) अध्यक्ष आहेत. विशेष म्हणजे पीएमसी-एसटीएस लाँच व्हेइकल प्रोजेक्ट आणि प्रोग्रामबाबत निर्णय घेते. गगनयानसाठी एचआरसीबी अर्थात ह्युमन रेटेड सर्टिफिकेशन बोर्डाचे ते अध्यक्ष आहेत.

नारायणन यांच्या नेतृत्वाखाली एलपीएससीने इस्रोच्या अनेक मोहिमांसाठी १९० लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम आणि कंट्रोल पॉवर प्लांट उपलब्ध करून दिले आहेत. आदित्य अंतराळयान आणि जीएसएलव्ही एमके-आयएलएस मोहिमा, चांद्रयान-२ आणि चांद्रयान-३ प्रणोदन प्रणालीतही त्यांनी मोठ योगदान दिलं आहे.  त्यांना आयआयटी खरगपूरचे रौप्यपदक, एएसआयचे (अॅस्ट्रोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया) सुवर्णपदक आणि एनडीआरएफचे राष्ट्रीय डिझाइन पुरस्कार असे २५ पुरस्कार मिळाले आहेत.

LPSC चे संचालक म्हणून त्यांनी अनेक प्रगत प्रणाली विकसित केल्या आहेत. इस्रोच्या यशस्वी मोहिमांचा भाग बनलेल्या ॲब्लेटिव्ह नोजल सिस्टीम, कंपोझिट मोटर केस आणि कंपोझिट इग्निटर केसच्या निर्मितीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. नुकतीच हाती घेण्यात आलेली इस्रोची महत्वाकांशी स्पेडेक प्रक्षेपणात  (स्पेस डॉकिंग तंत्रज्ञान)  त्यांनी मोठी भूमिका बजावली आहे. या  तंत्रज्ञानामुळे  भारतअमेरिका, रशिया आणि चीन यांसारख्या स्पेस डॉकिंगची तांत्रिक क्षमता असलेल्या देशांच्या यादीत जाऊन बसला आहे. या  तंत्रज्ञानाच्या यशस्वी चाचणीमुळे भारताला अंतराळातील आपले स्थान मजबूत करण्यास मदत झाली आहे. हे तंत्रज्ञान चांद्रयान ४  आणि गगनयान सारख्या भविष्यातील इस्रोच्या  मोहिमांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 

एस सोमनाथ यांचा प्रवास

इस्रोचे विद्यमान प्रमुख एस. सोमनाथ यांनी जानेवारी २०२२ मध्ये इस्रोचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका, सोव्हिएत युनियन आणि चीननंतर चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला. २३  ऑगस्ट २०२३ रोजी भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. सध्या भारत अंतराळात मानव पाठवण्याच्या तयारीत आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर