isro chandrayaan 4 mission plan : चांद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर जवळपास ६ महिन्यांनंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आत आणखी एक मोठी झेप घेण्याच्या तयारीत आहेत. इस्रोने चांद्रयान ४ मोहिमेसंदर्भात माहिती दिली आहे. या मोहिमे संदर्भात चर्चा सुरू असून त्यावर लवकरच काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली आहे. या मोहिमेची रचना आणि आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात येत आहे.
ऑगस्ट २०२३ मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आल्याची माहिती आहे. यानंतर, इस्रोने चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वीवर माती आणण्यासाठी आता मोहीम हाती घेतली आहे. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी GSLV-F14/INSAT-3DS उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर या मोहिमेची माहिती दिली. सोमनाथ म्हणाले की, चांद्रयान 3 च्या यशानंतर, अंतराळ संस्था भविष्यात चांद्रयान ४, ५, ६ आणि ७ मोहिमा पाठवण्याच्या तयारीत आहेत.
सोमनाथ म्हणाले, चांद्रयान-४ अंतराळयानामध्ये काय असावे यावर आम्ही सध्या काम करत आहोत. चांद्रयान ४ मधील उपकरणे कोणती असावीत हा पहिला प्रश्न आहे. यावेळी काहीतरी वेगळे करण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. सोमनाथ म्हणाले, 'आम्ही सर्वप्रथम ठरवले की चंद्रयान४ च्या माध्यमातून चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जावेत. आम्हाला या साठी खास रोबोट तयार करायचा आहे. त्यामुळे सध्या या मोहिमेबाबत चर्चा सुरू आहे. उपलब्ध रॉकेटसह हे कसे करायचे यावर विचारमंथन सुरू आहे. चंद्रावर जाणे आणि तेथून मातीचे नमुने आणणे हे खूप गुंतागुंतीचे काम आहे.
सोमनाथ म्हणाले की, शास्त्रज्ञ चांद्रयान ४ मोहिमेसाठी उच्चस्तरीय तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कामाला लागले आहेत. ही मोहीम पूर्ण करण्यासाठी आम्ही उच्च तंत्रज्ञान विकसित करत असून सरकारच्या मान्यतेनंतर आम्ही तुम्हाला याबाबत माहिती देऊ. या मोहिमेच्या घोषणेसाठी थोडी वाट पहावी लागणार आहे. त्याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुढील पिढीच्या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या उपग्रहाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. शाह यांनी एक्स वरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'तिसऱ्या पिढीतील उपकरणे भारताला नैसर्गिक आपत्तींशी लढण्यासाठी मजबूत बनवतील. तसेच कोणत्याही प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीत जीवितहानी होऊ नये हा पंतप्रधान मोदींचा संकल्प साकार करण्याच्या दिशेने हे मोठे पाऊल आहे.
संबंधित बातम्या