isro captures stunning satellite image of ram mandir : अयोध्येत राम मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. संपूर्ण अयोध्या नगरी उजळून निघाली आहे. लाखो भाविक अयोध्येत पोहचले असून हा सोहळा ते याची देही याची डोळा अनुभवणार आहेत. दरम्यान, अयोध्या येथे उभारण्यात येणारे राम मंदिर हे अंतराळातून कसे दिसते याचे मनमोहक छायाचित्र इस्रोच्या उपग्रहाने टिपले आहे. भारतीय रिमोट सेन्सिंग सीरीजच्या सॅटेलाइटने हे फोटो घेतले असून २.७ एकर परिसरात पसरलेल्या राम जन्मभूमीचा संपूर्ण परिसर यात दिसत आहे.
संपूर्ण जगाचे लक्ष लागून असलेल्या श्रीराम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा सोहळा उद्या २२ जानेवारी होणार आहे. हा सोहळा न भूतो न भविष्यती असा होणार आहे. या सोहळ्यासाठी ८ हजाराहून अधिक लोकांना निमंत्रण देण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी प्रभू रामाच्या मृतीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर आता इस्रोने अवकाशातून टिपलेले फोटो व्हायरल होत आहेत.
इस्रोने उपग्रहाद्वारे टिपलेल्या फोटोमध्ये दशरथ महाल आणि शरयू नदी दिसत आहे. तसेच अयोध्येतील रेल्वे स्थानक सुद्धा यात दिसत आहे. अंतराळात सर्वाधिक उपग्रह असलेला भारत जगातील चवथा देश आहे. सध्या भारताकडे ५० हून अधिक उपग्रह आहेत. त्यापैकी काहींचे रिजोल्यूशन हे एक मीटरपेक्षाही कमी आहे. राम मंदीराचे हे फोटो इस्रोच्या हैदराबादमधील राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटरद्वारे टिपण्यात आले आहेत.
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मंदिरांना भेटी देत आहेत. अयोध्येच्या माजी राजाचे भव्य निवासस्थान असलेले राज सदन, येथील विविध मंदिरे आणि इतर इमारती या अभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने दिव्यांनी उजळून निघाल्या आहेत. या मंदिरनगरीत दिवाळी सारखे वातावरण निर्माण झाले आहे. अयोध्या या प्राचीन शहराला आकर्षक पद्धतीने सजवण्यात आले आहे.