Israel-Hezbollah War : इस्रायलने २७ सप्टेंबर रोजी लेबनॉनची राजधानी बेरूतवर केलेल्या हवाई हल्ल्यात हिजबुल या दहशतवादी संघटनेचा प्रमुख हसन नसरल्लाहचा मृत्यू झाला. नसरल्लाह इस्रायलचा सर्वात मोठा शत्रू होता. मागील बऱ्याच काळापासून लपून बसलेल्या नसरल्लाहला इस्रायलने अचूक टिपले. हॉस्पिटलच्या खाली असलेल्या ज्या बंकरमध्ये नसरल्लाह रहात होता, त्या गुप्त बंकरमध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सचे सोने आणि रोख रक्कम सापडल्याचा मोठा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे.
लेबनॉनमधील एका हॉस्पिटलच्या खाली एक गुप्त बंकर आहे. त्यामध्ये ५०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त किमतीचे सोने आणि रोख रक्कम आहे, अशी माहिती इस्रायल डिफेन्स दिली आहे. इस्रायलच्या लष्कराने सोमवारी हिजबुल्लाहवर धक्कादायक आरोप केला. त्यानुसार हिजबुल्लाहने बैरूतमधील एका रुग्णालयाखाली कोट्यवधी डॉलर्स आणि सोनं लपवून ठेवलं आहे. इस्रायली सैन्याने पुढे या ठिकाणी हल्ला करणार नसल्याचे म्हटले आहे. सध्या त्याचे लक्ष्य हिजबुल्लाहची आर्थिक ठिकाणे आहेत. अल-सालेह रुग्णालयाचे संचालक आणि शिया अमल मूव्हमेंट पार्टीचे लेबनानचे आमदार फादी अलामेह यांनी इस्रायलच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले आहे. फादी अलामेह यांनी इस्रायलचे हे आरोप खोटे आणि निराधार असल्याचे म्हटले आहे.
अलामेह म्हणाले की, लेबनानी लोक लष्कराच्या रुग्णालयात आले आणि त्यांनी पाहिले की तेथे फक्त ऑपरेशन रूम आणि रुग्ण आहेत. त्यानुसार हे रुग्णालय रिकामे करण्यात येत आहे. इस्रायलच्या लष्कराचे मुख्य प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल हॅगरी यांनी दिलेल्या वृत्ताला रॉयटर्सने दुजोरा दिलेला नाही. डॅनियल हॅगरी म्हणतात की, इस्रायलच्या गुप्तचर विभागाने ही माहिती गोळा करण्यासाठी अनेक वर्षे मेहनत घेतली आहे. रॉयटर्सला या प्रकरणी हिजबुल्लाहपर्यंत पोहोचता आले नाही.
हे बंकर हिजबुल्लाहचा माजी प्रमुख सय्यद हसन नसरल्लाह याने बांधला होता, असा दावा डॅनियल हेगरी यांनी केला आहे. यावेळी बंकरमध्ये अनेक दशलक्ष डॉलरची रोकड असल्याचे त्यांनी सांगितले. मी लेबनॉन सरकार, तेथील अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संस्थांना आवाहन करतो की, हिजबुल्लाहला दहशत पसरवण्यासाठी आणि इस्रायलवर हल्ला करण्यासाठी या पैशांचा वापर करू देऊ नका, असे हेगरी म्हणाले. हेगरी पुढे म्हणाले की, इस्रायली हवाई दल या संकुलावर लक्ष ठेवून आहे. मात्र, आम्ही स्वत:हून रुग्णालयावर हल्ला करणार नाही.
दरम्यान, इस्रायलच्या चीफ ऑफ जनरल स्टाफने लेबनॉनमधील हल्ल्यांची माहिती दिली आहे. रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री या विमानांनी अल-कर्द आणि अल-हसन मधील ३० लक्ष्यांवर हल्ले केले. इस्रायलच्या मते हे सर्व हिजबुल्लाहचे आर्थिक तळ आहेत. तसेच आगामी काळातही असे हल्ले सुरूच राहतील, असे हेगरी यांनी सांगितले.