Israel Hostage to be Released : गेल्या ४७ दिवसांपासून हमास आणि इस्रायल संघर्ष सुरू आहे. या युद्धात आता पर्यंत १२ हजार पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हमासने इस्रायलचे काही नागरीक ओलिस ठेवले असून हे नागरीक परत आणण्यासाठी इस्रायलने प्रयत्न सुरू केले आहेत. दरम्यान, काल रात्री झालेल्या एका बैठकीत हे युद्ध थांबण्याची आशा निर्माण झाली आहे. इस्रायली मंत्रिमंडळाने गाझामधील ओलिसांच्या सुटकेसाठी हमासबरोबरच्या एका कराराला मंजुरी दिली आहे. हमासने देखील काही ओलिसांना मुक्त करण्यास मंजूरी दिली आहे.
इस्रायली मंत्रिमंडळाने बहुमताने मतदान करून हा करार मंजूर केला आहे, या कारारानुसार काही इस्रायली ओलीसांची हमासच्या तावडीतून सुटका केली जाणार आहे. ओलीसांच्या सुटकेसाठी इस्रायल आणि हमास यांच्यात झालेल्या कराराला मंजुरी देण्यासाठी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना मंजुरी देण्यास सांगितले होते. टाईम्स ऑफ इस्रायलच्या वृत्तानुसार, मंगळवारी रात्री झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले की, हा करार कठीण असला तरी योग्य आहे. मात्र, सर्व ओलिसांची सुटका होईपर्यंत हमासच्या दहशतवाद्यांविरोधातील हल्ले सुरूच राहतील, असे देखील ठामपणे ते म्हणाले.
करारानुसार हमासचे दहशतवादी ४ ते पाच दिवसांत सुमारे ५० ओलिसांची सुटका करतील. यामध्ये लहान मुले आणि महिलांचा समावेश आहे. इस्रायली माध्यमांच्या म्हणण्यानुसार, करारामध्ये इस्त्रायली ओलिसांच्या सुटकेवर लक्ष केंद्रित केले आहे, हमासने ओलिस ठेवलेल्या स्त्रिया आणि मुले यांची प्राधान्याने सुटका केली जाणार आहे. या करारानुसार इस्रायल गाझा पट्टीमध्ये चार-पाच दिवसांसाठी युद्धविराम करण्यात येणार आहे.
या बाबत सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यात हमासने ओलिस घेतलेल्या अनेक नागरिकांची सुटका करण्यासाठी करार जाहीर केला आहे. यामुळे हमास आणि इस्रायलमध्ये ४७ दिवसांपासून सुरू असलेले युद्ध काही दिवस थांबू शकते. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते नाजिद अल-अन्सारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक आठवड्यांच्या वाटाघाटीनंतर मंगळवारी सकाळी कतारने कराराचा प्रस्ताव ठेवला, ज्यावर दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनीही मंगळवारी पुष्टी केली की गेल्या सहा आठवड्यांपासून झालेल्या दीर्घ चर्चेनंतर ओलीसांना परत पाठवण्याचे प्रयत्न जवळपास यशस्वी होण्याच्या मार्गावर आहेत.
याआधी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता युद्ध मंत्रिमंडळाची बैठक बोलावली होती. त्यानंतर त्यांनी स्थानिक वेळेनुसार रात्री आठ वाजता संपूर्ण मंत्रिमंडळाची बैठक बोलावली. या बैठकीत इस्रायलने ओलीसांच्या सुटकेसाठीच्या तडजोडीच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरीक ठार झाल्यावर हमास विरोधात मोठी मोहीम इस्रायलने सुरू केली होती. गाझामध्ये २४० लोकांचे अपहरण करून हमासने त्यांना ओलीस ठेवले होते. ओलिसांमध्ये ४० मुले, अनेक वृद्ध आणि डझनभर थाई आणि नेपाळी नागरिकांचा समावेश आहे.
ओलिसांच्या सुटकेच्या करारामध्ये इस्रायली तुरुंगात बंदिस्त असलेल्या सुमारे १५० ते ३०० पॅलेस्टिनी कैद्यांच्या सुटकेचाही समावेश आहे. ज्यात अनेक महिला आणि अल्पवयीन आहेत, असे द टाईम्स ऑफ इस्रायलने चॅनल १२ चा हवाला देऊन वृत्त दिले आहे.