गाझावासीयांवर पुन्हा तुटून पडले इस्रायली सैन्य ; जमिनीवरील कारवाई सुरू, युद्धभूमीवर उतरवले रणगाडे
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गाझावासीयांवर पुन्हा तुटून पडले इस्रायली सैन्य ; जमिनीवरील कारवाई सुरू, युद्धभूमीवर उतरवले रणगाडे

गाझावासीयांवर पुन्हा तुटून पडले इस्रायली सैन्य ; जमिनीवरील कारवाई सुरू, युद्धभूमीवर उतरवले रणगाडे

Updated Mar 20, 2025 12:49 PM IST

गाझामधील शस्त्रसंधी करार संपुष्टात आला आहे. गाझावर हवाई हल्ले केल्यानंतर इस्रायलने आता जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे. इस्रायलने बुधवारी केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रांच्या एका कर्मचाऱ्यासह डझनभर लोक ठार झाले होते.

इस्रायलकडून गाझापट्टीवर पुन्हा हल्ले
इस्रायलकडून गाझापट्टीवर पुन्हा हल्ले (REUTERS)

गाझामधील जनतेला अखेरचा इशारा दिल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले आहेत. हवाई हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने आता गाझावर जमीनी कारवाई सुरू केली आहे. इस्रायलच्या लष्कराने बुधवारी सांगितले की, त्यांनी गाझामध्ये लक्ष्यित जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे आणि गाझाचा काही भाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच गाझावर हवाई हल्ले सुरू झाले होते. या हल्ल्यांमध्ये ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर हमाससोबतचा शस्त्रसंधी करारही संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता.

इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) बुधवारी दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षा क्षेत्राचा विस्तार करण्यासाठी आणि उत्तर आणि दक्षिण गाझादरम्यान अंशतः बफर तयार करण्यासाठी सैनिकांनी मध्य आणि दक्षिण गाझा पट्टीमध्ये जमीनी कारवाई सुरू केली आहे. नेटझरीम कॉरिडॉरच्या मध्यभागी जवानांनी ताबा मिळवला आहे, असे लष्कराने म्हटले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात जानेवारी महिन्यात झालेल्या शस्त्रसंधी करारानुसार इस्रायलने नेतझारिम कॉरिडॉरमधून सैन्य मागे घेतले होते. हा कॉरिडॉर गाझाला दोन भागात विभागतो. शस्त्रसंधी लागू झाल्यानंतर लाखो पॅलेस्टिनी या कॉरिडॉरच्या माध्यमातून आपापल्या घरी परतले.

संयुक्त राष्ट्र सहायता कर्मचाऱ्याचा मृत्यू -

उत्तर गाझामधील बेत लाहिया येथील एका स्मशानभूमीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्यात २४ जण ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अल-साबरा या गाझा सिटी परिसरात झालेल्या हल्ल्यात सहा मुलांसह २१ जण ठार झाले. इस्रायलने बुधवारी केलेल्या हल्ल्यात संयुक्त राष्ट्रसंघाचा एक कर्मचारीही ठार झाला होता. मध्य गाझामधील संयुक्त राष्ट्रांच्या गेस्ट हाऊसवर झालेल्या स्फोटक हल्ल्यात त्यांचा एक आंतरराष्ट्रीय मदत कर्मचारी ठार झाला असून पाच जण जखमी झाले आहेत, असे संयुक्त राष्ट्रसंघाने म्हटले आहे. गाझामधील पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने या हल्ल्यासाठी इस्रायली लष्कराला जबाबदार धरले आहे, परंतु आयडीएफने गेस्टहाऊसच्या परिसरात हवाई हल्ला केला नसल्याचे म्हटले आहे.

हमासने बंधकांची सुटका करण्यास नकार दिल्याचा आरोप इस्रायलने केला आहे. हमास इस्रायलवर मोठ्या हल्ल्याच्या तयारीत होता आणि त्यामुळेच इस्रायली सैन्याने हे हल्ले केले आहेत, असेही इस्रायलने म्हटले आहे. इस्रायली बंधकांची सुटका न झाल्यास आणि हमासने गाझा बाहेर न काढल्यास गाझामधील जनतेला त्याची संपूर्ण किंमत मोजावी लागेल, असा इशारा संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी बुधवारी दिला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शस्त्रसंधी संपुष्टात आणून बंधकांचा जीव धोक्यात आणल्याचा आरोप हमासने केला आहे. इस्रायलचा हा हल्ला शस्त्रसंधी कराराचे नवे आणि धोकादायक उल्लंघन असल्याचे हमासने म्हटले आहे. हमासने बुधवारी एका निवेदनात म्हटले आहे की, जानेवारीमध्ये इस्रायलबरोबर झालेल्या शस्त्रसंधी करारासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Shrikant Ashok Londhe

TwittereMail

श्रीकांत लोंढे हिंदुस्तान टाइम्स-मराठी मध्ये चीफ कन्टेन्ट प्रोड्यूसर आहे. प्रादेशिक, राष्ट्रीय, राजकीय व गुन्हेविषयक बातम्या कव्हर करतो. प्रिंट आणि डिजिटलमध्ये एकूण १४ वर्षांचा अनुभव. यापूर्वी दैनिक लोकमत, लोकमत समाचार, ईनाडू न्यूज, ईटीव्ही-भारत मध्ये रिपोर्टिग आणि डेस्कवरील कामाचा अनुभव. विशेष स्टोरीज, क्रीडा, राजकारण, मनोरंजन तसेच बिझनेसच्या बातम्याही कव्हर करतात.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर