Israel Hamas Ceasefire : इस्रायल आणि हमास यांच्यात गाझामध्ये गेल्या १५ महिन्यांपासून सुरू असलेलं विनाशकारी युद्ध थांबवण्यासाठी शस्त्रसंधी करारावर सहमती झाली आहे. या प्रकरणी मध्यस्थांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यामुळे इस्राइली बंधकांच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. इस्रायल आणि हमास यांच्यातील शस्त्रसंधी कतार आणि अमेरिकेच्या मध्यस्थीमुळे शक्य झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचे सरकार येण्यापूर्वी ही शस्त्रसंधी झाल्याने जो बायडन प्रशासनाची ही मोठी उपलब्धी समजली जात आहे. यापूर्वी अमेरिकेने इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात मध्यस्थी करून शस्त्रसंधी केली होती.
यापूर्वी इस्रायलने हमासवर नवीन अटी लादल्याचा आरोप करून शस्त्रसंधी करार रद्द करण्यात आल्याचे वृत्त होते. मात्र, नव्या वृत्तानुसार इस्राइल आणि हमास दोघांनीही शस्त्रसंधी करारावर स्वाक्षरी करण्यास सहमती दर्शवली आहे.
कतारची राजधानी दोहा येथे आठवडाभर चाललेल्या चर्चेनंतर हमासने बंधकांची टप्प्याटप्प्याने सुटका करणे, इस्रायलमधील शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका आणि हजारो विस्थापितांना गाझामध्ये परत पाठविणे यांचा समावेश आहे. या करारानुसार गाझाला अत्यंत आवश्यक मानवतावादी मदतही देखील दिली जाणार आहे.
अमेरिकेचे तीन अधिकारी आणि हमासच्या एका अधिकाऱ्याने करार झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. दोहा येथे मध्यस्थांच्या अधिकृत घोषणेपूर्वी करारावर चर्चा करण्यात आल्याची माहिती अमेरिकेच्या तीन अधिकाऱ्यांनी दिली. अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष जो बायडेन गुरुवारी या करारावर चर्चा करण्याच्या तयारीत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
या कराराला इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या मंत्रिमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता असली तरी येत्या काही दिवसांत हा करार अंमलात येण्याची शक्यता आहे. या करारानुसार पहिले सहा आठवडे युद्ध थांबण्याची शक्यता असून, त्यासोबत युद्ध पूर्णपणे थांबवण्यासाठी वाटाघाटी सुरू होतील.
हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिक ठार झाले होते. तर २५० लोकांना बंधक बनवले होते. त्यानंतर इस्रायलने हमासचा बीमोड करण्यासाठी गाझा पट्टीवर भीषण हल्ले सुरू केले. या हल्ल्यात आतापर्यंत ४६,००० हून अधिक पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले, अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. याव्यतिरिक्त, गाझाची अंदाजे ९० टक्के लोकसंख्या विस्थापित झाली. नोव्हेंबर २०२३ मध्ये आठवडाभर चाललेल्या शस्त्रसंधीदरम्यान गाझामधून १०० हून अधिक बंधकांची सुटका करण्यात आली होती.
संबंधित बातम्या