उत्तर आफ्रिकेतील इस्लामिक देश मोरोक्कोच्या राजाने यावर्षी ईद-उल-अजहानिमित्त धार्मिक सणादरम्यान मेंढ्यांची कुर्बानी देऊ नये, असे आवाहन केले आहे. देश सलग सातव्या वर्षी दुष्काळाचा सामना करत असल्याचे राजा मोहम्मद सहावे यांनी आपल्या देशवासियांना सांगितले आहे. त्यामुळे देशातील पशुधनाची संख्या कमालीची घटली असून मांसाचे दर वाढले आहेत. दरवर्षी ईद-उल-अजहाच्या काळात जगभरातील मुस्लिम लाखो मेंढ्या, बकऱ्या आणि इतर जनावरांची कुर्बानी देतात.
यावर्षी ईद-उल-अजहा ६ किंवा ७ जून रोजी साजरी केली जाईल. इस्लाम धर्मातील दोन प्रमुख सणांपैकी हा एक सण आहे. इस्लामी मान्यतेनुसार हजरत इब्राहिम यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ ईद-उल-अजहा साजरी केली जाते. याला बकरी ईद, ईद उल जुहा, बकरी ईद किंवा ईद उल बकरा असेही म्हणतात. बकरी ईदनिमित्त नमाज पठण तसेच जनावरांचा बळी देण्याची प्रथा आहे. कुर्बानीनंतर मुस्लीम समाज ते मांस आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये वाटून खातो आणि काही भाग गरिबांना दानही करतो.
बुधवारी राष्ट्रीय दूरचित्रवाणीवर धार्मिक कार्य मंत्र्यांनी वाचलेल्या किंग मोहम्मद सहावे यांच्या भाषणात म्हटले आहे की, "आपला देश हवामान आणि आर्थिक आव्हानांचा सामना करत आहे, ज्यामुळे पशुधनात लक्षणीय घट झाली आहे. त्यामुळे ईदला जनावरांची कुर्बानी देणे टाळावे. ईदच्या सणाचे महत्त्व ओळखून राजाने आपल्या लोकांना "कुर्बानीचा विधी करणे टाळण्याचे" आवाहन केले.
मोहम्मद सहाव्याचे वडील हसन द्वितीय यांनी १९६६ मध्ये अशाच प्रकारचे आवाहन केले होते, जेव्हा देश प्रदीर्घ दुष्काळाने होरपळत होता. सध्या जनावरांच्या संख्येत घट झाल्यामुळे मांसाच्या किंमती वाढल्या आहेत - ज्यामुळे गरिबांवर बोजा वाढला आहे, ज्यांचे किमान वेतन दरमहा सुमारे २९० युरो आहे. मोरोक्कोला सलग सातव्या वर्षी दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तेथील जनावरांच्या संख्येत १२ महिन्यांत ३८ टक्क्यांनी घट झाली आहे. मोरोक्कोच्या कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या ३० वर्षांच्या सरासरीपेक्षा ५३ टक्के कमी पाऊस झाला आहे.
मोरोक्कोमध्ये ९९ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या सुन्नी मुस्लिम असून ०.१ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या शिया मुस्लिम आहे. एकूण लोकसंख्येच्या १ टक्क्यांपेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या गटांमध्ये ख्रिस्ती, यहुदी आणि बहाई यांचाही समावेश आहे.
संबंधित बातम्या