IRCTC News : भारतीय रेल्वेची पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी शाखा असलेल्या इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची (IRCTC) वेबसाइट आणि अॅप सेवा आज ठप्प झाली आहे. त्यामुळं प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढता येईनासं झालं आहे. देखभाल-दुरुस्तीच्या कारणामुळं सेवेत हा खंड पडला आहे.
आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर या संदर्भात माहिती देण्यात आली होती. 'मेंटेनन्स अॅक्टिव्हिटीमुळे ई-तिकीट सेवा उपलब्ध होणार नाही. कृपया नंतर प्रयत्न करा. टीडीआर रद्द करण्यासाठी/ फाईल करण्यासाठी कस्टमर केअर नंबर 14646,08044647999 वर कॉल करा आणि 08035734999 किंवा etickets@irctc.co.in वर मेल करा, असं वेबसाइटवरील संदेशात सांगण्यात आलं आहे.
IRCTC पोर्टल ठप्प होण्याची या महिन्यातील ही दुसरी वेळ आहे. त्यामुळं प्रवाशांची चिंता वाढली आहे. प्रवाशांना तिकीट रद्द करायचे असल्यास ते कस्टमर केअरला कॉल करून किंवा तिकीट ठेव पावती (Ticket Deposit Receipt) साठी त्यांचा तिकीट तपशील ईमेल करून करू शकतात, असं आयआरसीटीसीनं म्हटलं आहे.
खासगी गाड्यांना उशीर झाल्यास नुकसान भरपाई देण्याची योजना इंडियन रेल्वे केटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) नं बंद केली आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेनं माहिती अधिकाराखाली दाखल केलेल्या अर्जावर आयआरसीटीसीनं हे उत्तर दिलं आहे. त्यानुसार, नुकसान-भरपाईची योजना १५ फेब्रुवारी २०२४ पासून बंद करण्यात आली आहे. याचं कारण गोपनीय असल्याचं सांगत कोणतीही माहिती देण्यास महामंडळानं नकार दिला. IRCTC च्या या भरपाई योजनेअंतर्गत, ऑक्टोबर २०१९ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत प्रवाशांना एकूण २६ लाख रुपये देण्यात आले. विशेषत: २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रवाशांना नुकसान भरपाई म्हणून १५.६५ लाख रुपये देण्यात आले.
आयआरसीटीसीने दोन तेजस गाड्या चालवण्यास सुरुवात केली, तेव्हा ऑक्टोबर २०१९ मध्ये ही योजना सुरू झाली. यातील एक ट्रेन नवी दिल्ली ते लखनौ आणि दुसरी अहमदाबाद ते मुंबई दरम्यान धावते. IRCTC च्या मते, या योजनेचा उद्देश प्रवाशांना या गाड्यांकडं आकर्षित करणं हा होता. तो एक मार्केटिंगचा भाग होता.
भरपाई योजनेंतर्गत ट्रेनला ६० ते १२० मिनिटं उशीर झाल्यास १०० रुपये आणि ट्रेनला १२० ते २४० मिनिटे उशीर झाल्यास २५० रुपये भरपाई दिली जात होती. तर ट्रेन रद्द झाल्यास प्रवाशांना संपूर्ण भाडं परत केलं जात होतं आणि उशीर झाल्यास खाण्यापिण्याची सुविधाही देण्यात आली होती.
संबंधित बातम्या