आपला शत्रू एकच… शुक्रवारच्या नमाजानंतर इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांची मुस्लिम राष्ट्रांना साद
मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  आपला शत्रू एकच… शुक्रवारच्या नमाजानंतर इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांची मुस्लिम राष्ट्रांना साद

आपला शत्रू एकच… शुक्रवारच्या नमाजानंतर इराणचे सर्वेसर्वा खामेनी यांची मुस्लिम राष्ट्रांना साद

Published Oct 04, 2024 03:10 PM IST

Israel Vs Iran : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांनी आज नमाजाच्या वेळी केलेल्या भाषणातून जगातील मुस्लिम राष्ट्रांना इस्रायलविरोधात एकजूट होण्याचं आवाहन केलं आहे.

इस्रायलला हरवण्यासाठी एकत्र या... शुक्रवारच्या नमाजानंतर खामेनी यांची मुस्लिम राष्ट्रांना साद
इस्रायलला हरवण्यासाठी एकत्र या... शुक्रवारच्या नमाजानंतर खामेनी यांची मुस्लिम राष्ट्रांना साद (AFP)

Ayatollah Khamenei On Israel : इस्रायल विरुद्ध हमास आणि पॅलेस्टिनच्या युद्धाची व्याप्ती आता वाढली आहे. इस्रायल व लेबनॉननं एकमेकांविरुद्ध हल्ले सुरू केल्यानंतर इराणही लेबनॉनच्या बाजूनं उतरला आहे. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांनी शुक्रवारच्या नमाजाचं नेतृत्व करताना इस्रायलवर तोफ डागत जगातील सर्व मुस्लिम राष्ट्रांना एकजूट होण्याचं आवाहन केलं.

गेल्या पाच वर्षांतील खामेनी यांचं हे पहिलंच जाहीर भाषण होतं. रायफल सोबत ठेवूनच ते बोलत होते. या भाषणातून त्यांनी इस्रायलवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. मुस्लिम देशांचा एकच शत्रू असून त्यांना एकजुटीनं पराभूत करायचं आहे, असं ते म्हणाले. हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाहच्या मृत्यूनंतर इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या भूमिकेचं खामेनी यांनी जोरदार समर्थन केलं. इराणच्या सैन्यानं केलेला हा हल्ला अत्यंत योग्य आणि कायदेशीर होता, असं ते म्हणाले.

'इस्रायलला प्रत्युत्तर देण्यास आम्ही उशीर करणार नाही, पण घाई देखील करणार नाही. इराणनं इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. गेल्या वर्षी ७ ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर दहशतवादी हल्ला केला होता, त्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव वाढला होता. इस्रायलनं गाझा पट्टीत हमासवर जोरदार प्रतिहल्ला केला आणि त्यानंतर लेबनॉनमधील हिजबुल्लाहला लक्ष्य केलं. यावेळी हिजबुल्लाहचा म्होरक्या नसरल्लाही मारला गेला. नसरल्लाच्या मृत्यूनंतर इराण आणि इस्रायलमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.

इस्रायल कधीच जिंकू शकणार नाही!

'हिजबुल्लाह आणि हमासच्या विरोधातील युद्ध इस्रायल कधीच जिंकू शकणार नाही', असा दावा त्यांनी केला. त्यांनी लेबनॉन आणि पॅलेस्टिनी लढवय्यांना देखील धीर दिला. 'रक्तपाताला घाबरून तुमची ताकद कमी होऊ देऊ नका. इस्रायल हिजबुल्ला आणि हमासवर कधीही विजय मिळवू शकणार नाही. इस्रायलच्या अलीकडच्या वर्तनामुळं संताप वाढत आहे आणि लढण्याचा निर्धार आणखी घट्ट होत आहे. इस्रायल नागरिकांच्या हत्या करून विजयाचा दिखावा करत आहे. इस्रायलचं संरक्षण करण्यामागचा अमेरिकेचा हेतू हा या प्रदेशातील नैसर्गिक साधनसंपत्ती बळकावण्याचा आहे, अशा शब्दांत त्यांनी अमेरिकेवरही निशाणा साधला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

देश विदेशात बातम्या, राजकारण समाजकारण क्षेत्रात घडणाऱ्या प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर