Iran Israel conflict : इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव वाढला आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केला आहे. तर इराणच्या ‘रिव्हॉल्युशनरी गार्ड्स’ने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीहून (यूएई) भारताकडे येणाऱ्या एका मालवाहू जहाज ताब्यात घेतले. हे जहाज इस्रायलचे असून हेलिकॉप्टरच्या मदतीने कमांडो जहाजावर उतरले, असे वृत्त इराणच्या सरकारी ‘आयआरएए’ या वृत्तसंस्थेने दिले आहे. या जहाजावर १७ कर्मचारी भारतीय आहेत. त्यांच्या सुटकेसाठी भारत सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत.
इराणच्या या कारवाईमुळे या भागातील तणाव आणखी वाढला आहे. इराणने जहाज ताब्यात घेतल्याचे जाहीर केल्यानंतर इराणला ‘परिणाम’ भोगावे लागतील, असा इशारा इस्रायलच्या लष्कराने दिला. "इराण तणाव आणखी वाढवत आहे. याचे परिणाम इराणला भोगावे लागतील," असे इस्रायली लष्कराचे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी एका निवेदनात म्हटले आहे. इराणच्या निमलष्करी दलाच्या रिव्होल्यूशनरी गार्डच्या कमांडोनी शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ एका मालवाहू जहाजावर कारवाई करत ते ताब्यात घेतले.
पोर्तुगीज देशाचा ध्वज असलेले हे मालवाहू जहाज MSC Aries असून या जहाजावर २५ खलाशी होते. या पैकी १७ भारतीय आहेत. इतर क्रू सदस्यांमध्ये चार फिलिपिनो, दोन पाकिस्तानी, एक रशियन आणि एक एस्टोनियन नागरिकांचा समावेश आहे. भारतीय नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच त्यांची सुटका करण्यासाठी भारत इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. एका सूत्राने सांगितले की, "आम्हाला माहिती आहे की 'एमएससी एरीज' हे मालवाहू जहाज इराणने ताब्यात घेतले आहे. आम्हाला या बाबट माहिती मिळाली आहे. या जहाजावर १७ भारतीय नागरिक आहेत. आम्ही सुरक्षितता, कल्याण आणि त्यांच्या सुटकेची खात्री करत आहोत. आम्ही तेहरान आणि दिल्लीच्या संपर्कात असून दोन्ही ठिकाणी राजनैतिक माध्यमांद्वारे इराणी अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे भारतीय परराष्ट्र अधिकाऱ्यांनी सांगितले.
इराणच्या सरकारी माध्यम संस्था IRNA वृत्तसंस्थेने जहाज ताब्यात घेतल्याच्या वृत्त दिले आहे. यापूर्वी, असोसिएटेड प्रेस (एपी) ने मिळवलेल्या व्हिडिओमध्ये कमांडो शनिवारी होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ हेलिकॉप्टरच्या मदतीने एका जहाजावर इराणी लष्कर ताबा मिळवत असल्याचे दिसत आहे. इराण आणि इस्रायलसह पाश्चात्य देशांमधील तणाव वाढला आहे.
ही घटना कॅमेऱ्यात कैद करण्यात आली आहे. हा व्हिडिओ ब्रिटीश लष्कराच्या 'युनायटेड किंगडम मेरीटाइम ट्रेड ऑपरेशन्स' संस्थेने प्रथम दिला. जहाजावरील क्रू मेंबरला "बाहेर येऊ नका" असे इराणचे लष्करी अधिकारी सांगतांना दिसत आहे. जहाज ताब्यात घेण्यात आलेले हेलिकॉप्टर इराणच्या निमलष्करी दलाच्या रिव्होल्युशनरी गार्डचे होते.
या हेलिकॉप्टरने यापूर्वी इतर जहाजांवरही छापे टाकले आहेत. वृत्तानुसार, जप्त केलेले जहाज पोर्तुगीज ध्वजांकित MSC Aries आहे. हे जहाज लंडनच्या झोडियाक मेरीटाईमचे मालवाहू जहाज आहे. Zodiac Maritime हा इस्रायली अब्जाधीश Eyal Ofer च्या Zodiac Group शी संबंधित आहेत.
इराण आणि पाश्चिमात्य देशांमधील वाढलेल्या तणावादरम्यान ही घटना घडली आहे, विशेषत: सीरियातील इराणी वाणिज्य दूतावासावर इस्रायलच्या हल्ल्यानंतर. इराणने जहाज ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे
ओमानचे आखात होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ आहे, पर्शियन गल्फचा एक अरुंद भाग ज्यातून जगातील २० टक्के तेलाची वाहतूक होते. हा भाग जगीतिक व्यापाराच्या दृष्टीने महत्वाचा आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या पूर्व किनाऱ्यावर असलेले फुजैरा हे नवीन तेल मालवाहू जहाजे, माल पुरवठा करणारे या क्षेत्रातील प्रमुख बंदर आहे.