Iran vs pakistan : इराणच्या सैन्यानं पुन्हा एकदा पाकिस्तानी हद्दीत घुसून सर्जिकल एअर स्ट्राइक केला आहे. सीमा ओलांडून इराणच्या लष्करी सैन्यानं जैश-अल-अदल या दहशतवादी संघटनेचा कमांडर इस्माईल शाह बक्श आणि त्याच्या काही साथीदारांचा खात्मा केला आहे.
इराण इंटरनॅशनलने शनिवारी सकाळी इराणच्या सरकारी माध्यमांच्या हवाल्यानं यास दुजोरा दिला. साधारण महिनाभरापूर्वी इराणच्या लष्करानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेल्या भागात दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. त्यामुळं इराण आणि पाकिस्तान संबंधांमध्ये प्रचंड तणाव आहे. अशातच आता पुन्हा एकदा इराणनं ही कारवाई केली आहे.
गेल्या महिन्यात १७ जानेवारीला इराणनं पाकिस्तानच्या दक्षिण-पश्चिम बलुचिस्तानमधील पंजगुरमध्ये हवाई हल्ला केला होता. त्यानंतर पाकिस्ताननं त्यास प्रत्युत्तर देत इराणच्या सीमेवरील बलुच बंडखोरांच्या तळांवर हल्ला केला.
अल अरेबिया न्यूजच्या वृत्तानुसार, इराणनं जैश अल-अदल या संघटनेविरुद्ध कारवाई केली आहे. या संघटनेची स्थापना २०१२ मध्ये झाली होती. इराणनं या गटाला 'दहशतवादी' घोषित केलं आहे. जैश अल अदल ही एक सुन्नी अतिरेकी संघटना आहे. ही संघटना प्रामुख्याने दक्षिण-पूर्व सिस्तान-बलुचिस्तान प्रांतात सक्रिय आहे.
जैश अल-अदलनं गेल्या काही वर्षांत इराणच्या सुरक्षा दलांवर अनेक हल्ले केले आहेत. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जैश अल-अदलनं सिस्तान-बलुचेस्तानमधील एका पोलीस ठाण्यावर हल्ला केला होता. त्यात ११ हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता.
इराण आणि पाकिस्तान हे दोघेही बलुचिस्तानच्या काही भागावर दावा करतात. गेल्या ७० वर्षांपासून इथल्या भौगोलिक परिस्थितीमुळं दोन्ही देशातील काही बलाढ्या टोळ्या सीमेपलीकडून बेकायदा कारवाया करत आहेत. मागच्या काही वर्षांत प्रगत आणि उच्च तंत्रज्ञानामुळं सीमेवर लक्ष ठेवण्याचं काम सोपं झालं आहे. त्यामुळं दोन्ही देशांमधील सीमावादावरून तणाव वाढला आहे. जैश अल-अदल ही दहशतवादी टोळी पाकिस्तानच्या भूमीचा वापर करून आमच्या देशात हल्ले करते, असा इराणचा आरोप आहे.
संबंधित बातम्या