israel iran war : इस्रायल सध्या लेबनॉन आणि गाझामध्ये मोठ्या प्रमाणात हवाई आणि जमिनी हल्ले करत आहे. हमासने शस्त्रसंधीवर सहमती दर्शवली असली, तरी इस्रायल हे युद्ध थांबवण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे युद्धाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्यात इराण इस्रायलवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पुढे आली आहे. इस्रायलने इराणवर हल्ला केल्यास मोठे युद्ध होण्याची शक्यता आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, १ ऑक्टोबरला झालेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलने इराणवर हल्ला केल्यास प्रतिहल्ला म्हणून काय कारवाई करता येईल याची योजना इराण आखत आहे. रिपोर्टनुसार, इराणच्या ४ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, अयातुल्ला खामेनी यांनी लष्कराला तयारी सज्ज राहण्यास सांगितले आहे. जर इस्रायलने हल्ला केला तर प्रतिहल्ला कसा होणार, याचे नियोजन करण्याचे आदेश देखील त्यांनी दिले आहे.
यातील दोन अधिकारी इराणच्या लष्करातील आहेत. इस्रायलने इराणच्या आण्विक आणि तेल प्रकल्पांवर हल्ला केला तर युद्ध थांबणार नाही. ते म्हणाले की, इराण या युद्धाची व्याप्ती वाढवणार. असे झाल्यास संपूर्ण मध्यपूर्वेतील देशांना बसणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इराणकडून बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांचा ताफा सज्ज ठेवण्यात आला आहे. इस्रायलने हल्ला केल्यास एक हजार बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागली जाऊ शकतात. १ ऑक्टोबरला केवळ २०० क्षेपणास्त्रे इस्रायलवर डागण्यात आली होती. दोन्ही देशातील युद्ध भडकले तर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होईल, अशी चिंता अमेरिकेसह सर्वच देशांची आहे.
याशिवाय आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गही विस्कळीत होणार आहे. त्याचबरोबर इस्रायलने आपल्या लष्करी तळांवर हल्ला केल्यास फारसे नुकसान होणार नाही याचाही विचार इराणचे नेतृत्व करत आहे. इराण थेट हल्ला करणार नाही, अशीही शक्यता आहे. १ ऑक्टोबरच्या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून यापूर्वी इस्रायल इराणच्या तेल आणि आण्विक तळांना लक्ष्य करू शकतो, अशी चर्चा होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी थेट इराणला धमकी दिली की, या हल्ल्याचा बदला घेतला जाईल. विशेषतः इराणच्या संवेदनशील तळांना लक्ष्य केले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
इराणचे नेते म्हणत आहेत की, आम्हाला या भागात युद्ध आणि अस्थिरता नको आहे. परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांनी अनेकदा या मुद्द्याचा पुनरुच्चार केला आहे. पण यामुळे आम्ही कमकुवत आहोत आणि इस्रायलविरोधात बचावात्मक आहोत, असा संदेश जाऊ नये, असेही इराणला वाटते. यामुळेच इराणही आक्रमक पवित्रा दाखवत आहेच, पण थेट मोठ्या युद्ध इराण टाळण्याची शक्यता आहे.