Iran Israel War Update : इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाचा भडका उडाला आहे. इस्रायलने सीरियात इराणच्या दुतावसावर हल्ला केल्याचा बदला घेण्यासाठी काल रात्री इराणने इस्रायलवर (iran israel news) तब्बल २०० क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केला. मात्र, त्यातील बहुतांश क्षेपणास्त्र इस्रायलने हवेतच नष्ट केले असल्याचे इस्रायली लष्कराचे म्हणणे आहे. हल्ल्यामुळे इस्रायल संरक्षण दलाच्या तळाचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे इस्रायल गाझा युद्धानंतर आता इस्रायल इराण युद्ध पेटले आहे. या हल्ल्याला इस्रायल काय उत्तर देणार आता हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आयडीएफच्या म्हणण्यानुसार, इराणची क्षेपणास्त्रे इस्त्रायली हवाई क्षेत्रात पोहोचण्यापूर्वीच एरो एअर डिफेन्स सिस्टमने नष्ट केली. इस्रायलच्या दक्षिण भागात असलेल्या तळाचे क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे नुकसान झाले आहे. इस्त्रायली लष्कराचे म्हणणे आहे की यामुळे पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. परंतु मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची कोणतीही माहिती नाही.
इस्त्रायली लष्कराच्या म्हणण्यानुसार, इराणने प्रक्षेपित केलेले डझनभर ड्रोन आणि क्रूझ क्षेपणास्त्रेही लढाऊ विमानांनी पाडली. आयडीएफने सांगितले की, 'इस्रायलच्या दिशेने येणारे सर्व हवाई हल्ले रोखण्यासाठी हवाई दलाची विमाने तैनात करण्यात आली आहेत. दरम्यान, होम फ्रंट कमांडचे म्हणणे आहे की इस्रायलींना यापुढे बॉम्ब आश्रयस्थानांजवळ राहण्याची गरज नाही. मात्र, मेळाव्यावर निर्बंध आणि सर्व शैक्षणिक उपक्रमांवर बंदी कायम राहणार आहे. याक्षणी, आयएएफ लढाऊ विमाने आणि इस्रायली नौदलाची जहाजे इस्त्रायली हवाई आणि नौदल झोनमध्ये संरक्षण मोहिमेसाठी आयडीएफ हवाई संरक्षण प्रणाली हाय अलर्टवर आहेत. आयडीएफ सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
खरे तर काही दिवसांपूर्वी सीरियातील इराणच्या वाणिज्य दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता. यात इराणचे बडे लष्करी अधिकारी ठार झाले होते. त्यानंतर इराणने स्थानिक प्रॉक्सीचा वापर करून इस्रायलवर हल्ले सुरू करण्याची योजना आखली. मात्र, इराणने आपल्या मागण्या पूर्ण झाल्यास तणाव कमी करण्यास तयार असल्याचे संकेत दिले. तेहरानने स्पष्ट केले की गाझा वरील हल्ले कमी केल्यास इराण वाद वाढवणार नाही. तसेच तणाव निर्माण करणार नाही. गाझा पट्टीतील युद्धबंदीसह आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आपण मागे हटणार नसल्याचे इराणने म्हटले आहे. इराणला आण्विक कार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू करायची आहे. मात्र, इस्रायलने गाझावरील हल्ले सुरच ठेवले आहेत. इराणला अमेरिकेकडून आश्वासन हवे होते की ते या हल्ल्यात सहभागी होणार नाहीत. मात्र, अमेरिकेने ही मागणी फेटाळली.