Shivdeep Lande to contest Election : बिहार पोलीस दलातील 'सुपरकॉप व सिंघम' अशी उपमा मिळालेले भारतीय धडाकेबाज आयपीएस अधिकारी शिवदीप वामनराव लांडे यांनी प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर बिहारमध्येच राहण्याचा त्यांचा विचार असून विधानसभा निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाच्या तिकिटावर ते पाटणा शहरातून २०२५ ची विधानसभा निवडणूक लढवू शकतात, अशी चर्चा आहे.
निवडणूक प्रचाराच्या नियोजनात चाणक्य समजल्या जाणाऱ्या व अनेक निवडणुकांमध्ये मोठमोठ्या पक्षांसाठी काम करणारे प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी बिहारमध्ये जनसुराज अभियान सुरू केलं आहे. येत्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीचं औचित्य साधून ते नव्या पक्षाची घोषणा करणार आहेत. याच पक्षात शिवदीप लांडे प्रवेश करतील अशी शक्यता बोलून दाखवली जात आहे.
शिवदीप लांडे हे बिहार केडरचे २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असून बिहारमधील अनेक जिल्ह्यांत त्यांनी पोलीस अधीक्षक म्हणून कर्तव्य बजावलं आहे. ते आपल्या कठोर प्रतिमेसाठी ओळखले जातात. गुरुवारी दुपारी त्यांनी सोशल मीडिया साइट फेसबुकवर आपल्या राजीनाम्याची घोषणा केली.
तिरंग्याला सलाम करणाऱ्या फोटोसह लांडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकली आहे. त्यात ते लिहितात की ‘प्रिय बिहार, गेली १८ वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. इतकी वर्षे मी बिहारला स्वत:पेक्षा आणि माझ्या कुटुंबापेक्षा जवळचं मानलं आहे. लोकसेवक म्हणून माझ्या कार्यकाळात काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो. पोलीस सेवेचा राजीनामा दिला असला तरी मी बिहारमध्येच राहणार आहे आणि बिहार हीच यापुढंही माझी कर्मभूमी राहील.
याआधी आयपीएस अधिकारी आनंद मिश्रा यांनी पोलीस सेवेचा राजीनामा देऊन प्रशांत किशोर यांच्या जन सुराज संघटनेच्या पाठिंब्यावर बक्सर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र, ते पराभूत झाले. लांडे यांनी जन सुराजमध्ये प्रवेश केल्यास नोकरी सोडून प्रशांत किशोर यांच्या पक्षात प्रवेश करणारे ते दुसरे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असतील.