IPL 2024: हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर काल सनरायजझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाला लाजिरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी धावसंख्या गाठली. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सच्या संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावा लागले. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर आकाश अंबानी संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माशी बोलताना दिसला. त्यांचा एकमेकांशी बोलतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. यांनंतर हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवले जाणार का? अशा चर्चांना उधाण आले.
आयपीएल २०२४ च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी सोपवली. परंतु, हार्दिक पांड्याच्या नेत्तृत्वात मुंबई इंडियन्सच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली. यामुळे हार्दिक पांड्याच्या नेत्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. हैदराबादविरुद्ध पराभवानंतर आकाश अंबानीने रोहित शर्माशी संवाद साधला. त्यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच रोहित शर्माकडे पुन्हा एकदा मुंबईच्या संघाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.
मुंबईविरुद्धच्या सामन्यात हैदराबादच्या संघाने प्रथम फलंदाजी करत २७७ धावा केल्या. या कामगिरीसह हैदराबादने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढला. हैदराबादकडून हेनरिक क्लासेनने नाबाद ८० धावांची खेळी केली. त्याने ३४ चेंडूत ७ षटकार आणि ४ चौकार लगावले. याशिवाय, अभिषेक शर्मा (६३ धावा) आणि ट्रेविड हेडने ६२ धावांची खेळी केली.
हैदराबादने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबईच्या संघाला २४६ धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईचा फिरकीपटू पीयूष चावला सर्वात महाग गोलंदाज ठरला. त्याने अवघ्या २ षटकात ३४ धावा देऊन फक्त एक विकेट मिळवली. शम्स मुलानीने २ षटकात ३३ धावा दिल्या. तर, मफाकाने ४ षटकात ६६ धावा खर्च केल्या.