मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Indian Army Mobile : चिनी कंपनीचे स्मार्टफोन्स वापरू नका, तपास यंत्रणांचे भारतीय सैनिकांना निर्देश

Indian Army Mobile : चिनी कंपनीचे स्मार्टफोन्स वापरू नका, तपास यंत्रणांचे भारतीय सैनिकांना निर्देश

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Mar 08, 2023 06:14 PM IST

Indian Army Chinese Mobile : चीनी कंपनीच्या स्मार्टफोन्सच्या माध्यमातून भारतीय जवानांची डेटाचोरी होण्याचा संशय यंत्रणांना होता, त्यानंतर आता जवानांना महत्त्वपूर्ण निर्देश देण्यात आले आहेत.

Indian Army Chinese Mobile
Indian Army Chinese Mobile (HT)

Indian Army Chinese Mobile : गलवानमधील संघर्षानंतर चीनच्या सुरक्षा यंत्रणांनी चीनी स्मार्टफोन्स कंपनीच्या माध्यमातून भारतीय सैन्यातील जवानांवर पाळत ठेवण्याचा कुटील डाव आखल्याची माहिती समो आल्यानंतर आता भारतीय तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. कारण आता यंत्रणांनी भारतीय सैन्यातील जवानांना चीनी कंपनीचे स्मार्टफोन्सचा वापर टाळण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळं आता हवाई दल, नौदल आणि सैन्यातील जवानांना वनप्लस, ओप्पो आणि रियलमी कंपनीचे स्मार्टफोन्स बदलावे लागणार आहेत. सैन्यातील जवानांची गुप्त माहिती आणि सुरक्षा विभागातील गोपनीय माहिती स्मार्टफोन्सच्या माध्यमातून चोरण्याचा डाव चीनी यंत्रणांचा असल्यामुळं भारतीय तपास यंत्रणांनी त्यावर तातडीनं कार्यवाही करण्याचे आदेश काढले आहेत.

सुरक्षेची खबरदारी घेण्यासाठी आणि भारतीय सैन्यातील कोणतीही महत्त्वपूर्ण माहिती स्मार्टफोन्सच्या माध्यमातून चीनी सैन्याला मिळू नये, यासाठी भारतीय तपासयंत्रणा आणि संरक्षण मंत्रालयानं प्रयत्न सुरू केले आहेत. तिन्ही दलातील जवानांना चीनी कंपन्यांव्यतिरिक्त इतर कंपन्यांचे स्मार्टफोन्स वापरण्याचा सल्ला भारतीय तपास यंत्रणांनी दिला आहे. चीनी स्मार्टफोन्सचा वापर करणं ही मोठी जोखीम असून अनेकदा मोबाईल्सच्या माध्यमातून जवानांचा डेटा चोरण्यात आल्याच्या घटना समोर आल्यानंतर यंत्रणांनी महत्त्वपूर्ण निर्देश जारी केले आहेत.

गलवान खोऱ्यात भारतीय आणि चीनी सैन्यात हाणामारी झाल्यानंतर भारत सरकारनं अनेक चीनी कंपन्यांच्या अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर चीनी कंपनीच्या स्मार्टफोन्सवरही बंदी घालण्याची मागणी सुरक्षा तज्ज्ञांनी केली होती. कारण त्यामाध्यमातून भारतीय सुरक्षा विभागातील संवेदनशील माहिती चोरली जाण्याची भीती तज्ज्ञांना होती. त्यानंतर आता सैन्यातील असंख्य जवानांनी चीनी कंपन्यांचे स्मार्टफोन्स बदलण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे.

IPL_Entry_Point