Indian Naval Ship Sumitra Operation against Piracy : अरबी समुद्रात भारतीय नौदलाने समुद्री चाचांविरोधात पुन्हा मोठी कामगिरी केली आहे. भारतीय युद्धनौका आयएनएस सुमित्राने सोमवारी एडनच्या आखातात सोमाली चाच्यांना चोख प्रत्युत्तर देत १९ पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाची सुटका केली आहे. सोमालियाच्या चाच्यांनी मासेमारी करणाऱ्यांच्या जहाजाचं अपहरण केले होते. रविवारी या जहाजातून इमर्जन्सी कॉल आल्यावर तातडीने भारतीय युद्धनौका आयएनएस सुमित्राने चाचेगिरीविरोधी मोहीम सुरू करत बंधक बनवलेल्या पाकिस्तानी नागरिकांची सुटका केली.
भारतीय नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, ही मोहीम रविवारी राबवण्यात आली. आयएनएस सुमित्राने अपहरणाचा प्रयत्न मोडून काढत १९ पाकिस्तानी नागरिकांसह एका इराणी जहाजाची सुटका केली. रविवारी (दि २८) सोमालियाच्या समुद्री चाच्यांनी इराणी ध्वज असलेल्या मासेमारी करणाऱ्या एका जहाजाचे अपहरण केले. दरम्यान, या जहाजवरून मदतकरण्यासाठी एमर्जन्सी कॉल करण्यात आला. याची माहिती युद्धनौका आयएनएस सुमित्राला मिळाली. अल नैगी असे या जहाजाचे नाव असून माहितीच्या आधारे आयएनएस सुमित्राने तातडीने मोहीम राबवली. भारतीय नौदलाच्या मरीन कमांडोंनी सोमालियाच्या चाच्यांच्या तावडीतून १९ पाकिस्तानी नागरिकांसह संपूर्ण जहाजाची सुखरूप सुटका केली. सोमालियाच्या पूर्व किनारपट्टी भागात तैनात भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुमित्रा ने एकाच दिवसात दुसऱ्यांदा ही कामगिरी केली.
नौदलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमालियाच्या पूर्व किनारपट्टीवर तैनात असलेल्या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेने काही समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या इराणी जहाज आणि त्यातील क्रू सदस्यांची सुटका केली. या कारवाईच्या काही तास आधी देखील सोमाली चाच्यांनी आणखी एक इराणी मासेमारी करणाऱ्या जहाजाचे अपहरण केले होते. त्यानंतर नौदलाने आयएनएस सुमित्रा युद्धनौकेला मदतीसाठी पाठवले होते. या मोहिमेदरम्यान, भारतीय नौदलाने जहाज आणि त्यातील १७ क्रू मेंबर्स (सर्व इराणी) नागरिकांची सुरक्षित सुटका केली. या कारवाईनंतर काही वेळातच पुन्हा दुसऱ्या एका जहाजाचे अपहरण झाल्याची माहिती युद्धनौका आयएनएस सुमित्राला मिळाली. या माहितीवर कारवाई करत आयएनएस सुमित्राने अपहरण झालेले जहाज शोधून काढले. समुद्री चाच्यांनी हे जहाज ताब्यात घेतले होते. यात १९ पाकिस्तानी नागरिकांना ओलीस ठेवण्यात आले होते.
मरीन कमांडोंनी अत्यंत तत्परतेने समुद्री चाच्यांना प्रत्युत्तर दिले व समुद्री आत्मसमर्पण करण्यास भाग पाडले. यानंतर ओलीस ठेवलेल्या १९ पाकिस्तानी नागरिकांची सुटका करण्यात आली.
आयएनएस सुमित्राने या दोन मोहिमात ३६ नागरिकांचे प्राण वाचवले. यात १७ इराणी नागरिक तर १९ पाकिस्तानी नगरिकांचा समावेश आहे. या दोन्ही मोहिमा ३६ तासांपेक्षा कमी वेळात यशस्वी पणे राबवण्यात आल्या. भारतीय नौदलाने कोचीच्या पश्चिमेला सुमारे ८५० नॉटिकल मैल दक्षिण अरबी समुद्रात समुद्री चाच्यांची नौका बुडवली.
नौदलाच्या प्रवक्त्याने सांगितले की, "हिंद महासागर क्षेत्रात चाचेगिरीविरोधी आणि सागरी सुरक्षा मोहिमांमध्ये भारतीय नौदल महत्वाची भूमिका बजावत आहे. दोन दिवसांपूर्वी भारतीय नौदलाची युद्धनौका INS विशाखापट्टणमने देखील एका तेल टँकर जहाजाला समुद्री चाच्यांनी लावलेली आग विझवली होती. ज्यात २२ भारतीय क्रू मेंबर्स होते.