Madhya Pradesh News: मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये भिकाऱ्यांना भीक देणे नागरिकांच्या अंगलट येणार आहे. कारण, या शहरात भीक देताना आढळल्यास संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाईल. हा नवा नियम १ जानेवारीपासून लागू होणार आहे. शहराला भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी इंदूर पोलिसांनी हे नियम केले आहेत. या नियमांतर्गत इंदूरमध्ये भीक मागण्यावर बंदी घालण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून सध्या शहरात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे आणि नव्या वर्षापासून कारवाईला सुरुवात केली जाईल.
इंदूर शहर स्वच्छ आणि भिकाऱ्यापासून मुक्त करण्याच्या उद्देशाने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. १ जानेवारीनंतर एखादी व्यक्ती भीक देताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. यामुळे पोलिसांनी नागरिकांना भीकाऱ्यांना भीक न देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे. गेल्या काही महिन्यांत प्रशासनाने लोकांना भीक मागण्यास भाग पाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे, अशीही माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने देशातील १० शहरांना भिकाऱ्यांपासून मुक्त करण्यासाठी एक प्रकल्प सुरू केला आहे. या शहरांच्या यादीत इंदूरच्या नावाचाही समावेश आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी इंदूर जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ अन्वये भिक्षा मागण्यास आणि देण्यास मनाई करण्याचे आदेश दिले आहेत. ही तरतूद पूर्वीच्या फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १४४ सारखीच आहे. मर्यादित कालावधीसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्याचा अधिकार जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे. कलम १६३ अन्वये जारी केलेल्या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांना जास्तीत जास्त सहा महिने तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा होऊ शकते.
या मालिकेत इंदूर पोलिसांनी नुकतीच शहराला भिकाऱ्यापासून मुक्त करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. आतापर्यंत १४ भिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी पकडलेल्या भिकाऱ्यांमध्ये राजवाड्यातील शनी मंदिराजवळ भीक मागणाऱ्या महिलेकडून ७५ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. अवघ्या १० ते १२ दिवसांत ही रक्कम जमा झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार,शहरात अशी काही कुटुंबे आहेत जी वारंवार पकडली जाऊनही भीक मागताना दिसत आहेत. या मोहिमेअंतर्गत त्यांच्यावरही कडक पाळत ठेवण्यात येत आहे.
संबंधित बातम्या