Pilots Fall Asleep Mid-Air: इंडोनेशियामध्ये विमान ३६ हजार फूट हवेत असताना दोन्ही पायलट झोपी गेल्याची घटना उघडकीस आली. १५३ प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन्ही पायलटचे निलंबन करण्यात आले. ही घटना यावर्षी जानेवारी महिन्यात घडल्याचे सांगण्यात येत आहे. हे विमान सुलावेसीहून जकार्ताला दिशेने जात होते. त्यावेळी दोन्ही पायलट अर्धातास झोपले. परिणामी विमानाचा रस्ता चुकला. सुदैवाने, कोणतीही दुर्घटना घडली नाही.
विमानाने उड्डाण घेतल्यानंतर पायलटला काही वेळ आराम करायचा होता. याबाबत त्याने को-पायलटला सांगितले आणि झोपी गेला. आदल्या रात्री झोप पूर्ण न झाल्याने त्याच्या को-पायलटलाही झोप लागली. जकार्ता येथील क्षेत्र नियंत्रण केंद्राने विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, वैमानिकांकडून प्रतिसाद मिळाला नाही. २८ मिनिटांनंतर पायलटला जाग आली, तेव्हा त्याने पाहिले की त्याचा को- पायलटही झोपलेला होता. हे पाहून त्याला धक्काच बसला.
त्यानंतर पायलटने को- पायलटला झोपीतून उठवले. विमानाची दिशा चुकल्याचे दोघांच्याही लक्षात आले. यानंतर दोघांनी एसटीशी संपर्क साधून विमान योग्य मार्गावर नेले. चार फ्लाइट क्रू मेंबरसह १५३ प्रवाशांना घेऊन उड्डाण करणाऱ्या विमानाने कोणत्याही अडचणीशिवाय उड्डाण पू्र्ण केले. इंडोनेशियन परिवहन मंत्रालयाने या घटनेबद्दल बाटिक एअरवेजला फटकारले. बाटीक एअरवेजने जाहीर केले आहे की, संबंधित दोन्ही पायलटवर कारवाई करण्यात आली आहे.